प्रशासनातर्फे गुलाबाची पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा
श्रीरामपूर/प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईदुल-फित्र अर्थात रमजान ईद शनिवारी शहर व परिसरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ईदगाह मैदानावर प्रचंड मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज आदा केली.
यावेळी मुफ्ती मोहम्मद रिझवानुल हसन यांचे अत्यंत ओजस्वी असे प्रेम, स्नेह आणि समाजात आपुलकी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे वर्तन प्रत्येकाकडून व्हावे असे अभिप्रेत करणारे प्रवचन झाले. इस्लामने सामाजिक समस्यांचा पुरस्कार केला असून सर्वांनी जाती-धर्मविरहित एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी झाले पाहिजे. शेजार धर्म पाळताना सर्वांनीच एकमेकाला मदतीची भावना ठेवली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केले.
ईद निमित्ताने उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांना संबोधित करताना ते म्हणाले की, आपला देश बहुधर्मीय आणि बहुभाषीक आहे. या ठिकाणी सर्वांनी विविध चालीरीती परंपरा असणारे लोक एकत्र राहतात. कुणी किती विरोध केला तरी आपण आपला माणुसकी धर्म सोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली यांनी ईदच्या नमाजची इमामत केली. जामा मशीद इथेही ईदची नमाज अदा करण्यात आली. जामा मशिदीचे खतीब व इमाम हजरत मौलाना मोहम्मद ईमदादअली यांचे यावेळी प्रवचन झाले. मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी इमामत केली. जामा मशिदीत आलेल्या मान्यवरांचे स्वागत विश्वस्त डॉ. राज शेख, तनवीर रजा, मोहसीन बागवान, मुख्तार शाह यांनी केले. सूत्रसंचालन रज्जाक पठाण यांनी केले. याशिवाय शहरातील बहुतांश मशिदीतूनही ईदची नमाज अदा करण्यात आली.
जामा मशीद व ईदगाह मध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, दिलीप सानप, सिद्धार्थ मुरकुटे, निरज मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, लकी सेठी, नगरसेवक दिलीप नागरे, राजेंद्र पवार, दीपक वमने, डॉ. दिलीप शिरसाट, रितेश एडके, महेंद्र त्रिभुवन, अरुण मंडलिक, सत्यनाथ शेळके, रवी भांबारे, किशोर त्रिभुवन, विजय खाजेकर, पत्रकार नितीन चित्ते, जयेश सावंत, दीपक कदम यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईदच्या नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. इदगाह कमिटीचे अध्यक्ष मुजफ्फर शेख, याकुब बागवान, सलीम शेख,अश्फाक शेख व इतर सदस्यांनी सर्वांचं स्वागत केले.
पोलीस व महसूल प्रशासनातर्फे प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदींनी ईदगाह मध्ये मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या नमाज नंतर सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींनी मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन शिरखुर्मा चा आस्वाद घेतला.
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक तसेच ११ पोलीस उपनिरीक्षक व सुमारे १२५ पोलीस, होमगार्ड, आरसीपी पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.
...चौकट
सार्वमत व जनता आवाज चे आभार
गेले महिनाभर रमजान महिन्याचे सहेरी व इफ्तार चे वेळापत्रक दररोज प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक सार्वमत व दैनिक जनता आवाज या दोन्ही दैनिकांचे जामा मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाजातर्फे मौलाना इमदाद अली व डॉ राज शेख तसेच ईदगाह कमेटी व मुस्लिम पंचायत तर्फे नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी अभिनंदन करून आभार मानले.या निमित्ताने जामा मशीदीत ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा सत्कार करण्यात आला.
... चौकट
क्षीरखुर्मा व गुलाबाची फुले
ईदगाह कमिटीतर्फे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांसाठी ईदगाह मैदानात शामियाना टाकून क्षीरखुर्मा,भजे व गुलगुले यांची व्यवस्था करण्यात आली. आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, प्रांत अधिकारी किरण सावंत-पाटील, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व इतर मान्यवरांनी याप्रसंगी क्षीरखुर्माचा आस्वाद घेतला.
पोलीस विभागातर्फे ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना गुलाब पुष्प देण्यात आले. प्रांत अधिकारी किरण सावंत-पाटील, तहसीलदार वाघ, पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकारी पोलीस यांनी ईदगाहमधून बाहेर पडणाऱ्या मुस्लिम बांधवांना गुलाबाची फुले देऊन शुभेच्छा दिल्या.
... चौकट
सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस
रमजान ईद निमित्ताने अनेक हिंदू बांधवांनी आपल्या मुस्लिम मित्रांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ तसेच नानाविध प्रकारच्या आकर्षक अशा शुभेच्छा फलकांच्या पोस्ट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिवसभर झळकत होत्या. पक्षीय मतभेद विसरून सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.