सोलापूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आणि वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06 वाजून 25 मिनिटांनी लोकमान्य टिळक सभागृह अँफी थिएटरमध्ये ' सावरकर आणि मराठी भाषा ' या विषयावर सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते लेखक योगेश सोमण यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीमती रेणुका महागावकर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिले.
मराठी भाषेला राजवैभव प्राप्त करून देणारे ज्येष्ठ श्रेष्ठ कवी लेखक वि. वा. शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो, तसेच मराठी भाषेला असंख्य शब्द समूह देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार आणि इतिहास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा, या हेतूने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने 'सावरकर आणि मराठी भाषा' या विषयावर या व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने सोलापूर शहर जिल्हा तसेच महाराष्ट्रातील सर्व स्तरातील रसिक श्रोत्यांसाठी नवनवीन उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचाच भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ लेखक सिने आणि नाट्य अभिनेते योगेश सोमण यांचा मराठी भाषा आणि सावरकर या विषयावर गाढा अभ्यास असून ते आपले विचार या माध्यमातून मांडणार आहेत. अँफी थिएटरमध्ये होणाऱ्या या व्याख्यान कार्यक्रमात मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांनी सहभागी व्हावं, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
