ऑर्केस्ट्रा बारमध्ये टाकलेल्या छाप्यात 56, 01, 890 रूपयांचे साहित्य जप्त
सोलापूर : सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असतानाच ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यानं अनेकांच्या हर्ष-उल्हास अन् उत्साहावर विरजण पडलंय. दक्षिण सोलापूर कंदलगांव शिवारात पोलिसांनी ऑर्केस्ट्रा बारमध्ये टाकलेल्या छाप्यात 56, 01, 890 रूपये किंमतीचे डी. जे. साहित्य, ऑर्केस्ट्रा बार मधील साहित्य तसेच वाहने, मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या कारवाईत चालक-मालक, 12 बारबालांसह सरत्या वर्षाला निरोप तसेच डि.जे. च्या दणदणाटात नव वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र आलेल्या 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव शिवारात सुरू असलेल्या पुष्पक बार मध्ये काही महिला तोकडे कपडे घालून बिभत्सपणे अश्लील हावभाव व नृत्य करून डि. जे. वर नाचत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अतुल कलकर्णी यांना मिळाली, त्यानुसार पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी त्यांच्या विशेष पथकास या कारवाईबाबत सूचना देण्यात आली होती.
त्या अनुषंगाने विशेष पथक मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बार येथे कारवाई करिता गेले असता, तेथे 12 महिला तोकडे कपडे घालून बिभत्सपणे अश्लील नृत्य व हावभाव करून डि जे च्या तालावर अश्लील नृत्य करीत असल्याचे व तेथील ग्राहक नृत्यांगनावर नोटा सदश्य कुपन उधळून अश्लील हावभाव करून नाचताना मिळून आले. 
तसेच त्यांच्यासमोर असलेल्या सोप्यावर बसलेले काही लोक तसेच स्टेजसमोर देखील काही जण बसले होते, ते नोटा सदृश्य कुपन त्या महिलांवर उधळत होते. त्या ठिकाणी 12 बारबाला मिळून आल्या. 
पुष्पक ऑर्केस्ट्रा बारचे चालक भारत राजाराम तांबे (रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर), मालक रोहित पांडुरंग चव्हाण (रा. सोलापूर) आणि एकूण 55 ग्राहक तसेच ऑर्केस्ट्रा बार मधील डझनभर बारबाला अशा एकूण 70 लोकांविरूध्द मंद्रुप पोलीस ठाणे येथे गुन्हा महाराष्ट्र होटल, उपहारगृहे, आणि मद्यपान कक्ष, बाररूम, यामधील नृत्य व अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणारे महिलेच्या प्रतिष्ठेचे संरंक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 चे कलम 3, 8, (1), (2) (4), तसेच भारतीय न्याय संहिता 296 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या छाप्यात पुष्पक ऑर्केस्ट्रा बार येथून 56, 01, 890 रूपये किमतीचे डि. जे. साहित्य, ऑर्केस्ट्रा बार मधील साहित्य, वाहने आणि महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय, ग्राहक म्हणून आलेल्या 55 आरोपींची नावं मात्र उपलब्ध होऊ शकली नाहीत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल वी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक राहुल अतराम, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, स.पो.नि. अनिल सनगल्ले, पो.हे.कॉ. बिराजदार, पो.हे.कॉ. गोरे, पो.कॉ. जाधव, पो.कॉ. गणेश पाटील, महिला पो.कॉ. धनश्री हुळ्ळे, महिला पो.कॉ. राऊत, स.पो.नि. पवार, मंद्रुप पोलीस ठाणे व स्टाफ यांनी कारवाई केली.
