सनातन धर्माला जागृत करण्यासाठीच संचार क्रांती-पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

shivrajya patra
तब्बल साडेतीन तासाचं व्याख्यान; स्मृति मंदिरात आणि बाहेर तुडुंब गर्दी

सोलापूर : जगभरात झालेली संचार क्रांती सनातन धर्माला जागृत करण्यासाठीच आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने 'भारत का भविष्य' या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.

रविवारी, 07 डिसेंबर रोजी सायंकाळी हुतात्मा स्मृति मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी नगरचे देवगीरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे हे प्रमुख पाहुणे होते.

अनंतकाळापासून सनातन धर्म हा प्रत्येकाला जोडण्याचे काम करत आहे. आचार्य चाणक्य आणि वेदव्यास हेच या राष्ट्राचे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्या विचारांवरच भारताचे भविष्य आहे, असेही पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.

जे सत्य आहे ते बोलले पाहिजे, आजच्या पिढीने खरं आहे, ते मांडले पाहिजे तसेच अभ्यास केला पाहिजे. विविध विषयाची माहिती घेतली पाहिजे. आजच्या संचार क्रांतीच्या काळात ज्याच्याकडे माहिती आहे, तो बलवान आहे. महिलांचा आदर केला पाहिजे, त्यांचे रक्षण केले पाहिजे. सनातन धर्माचे आचरण केले पाहिजे, असंही ते म्हणाले. 

प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. अतिथी परिचयानंतर प्रमुख पाहुणे तसेच पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांना पुणेरी पगडी घालून आणि रसिका बडवे, सुधा अळ्ळीमोरे, मेधा कुलकर्णी, संयोगिता काकडे, रेणुका महागांवकर यांच्याकडून औक्षण करण्यात आले. नंतर त्यांचा सत्कार किशोर शितोळे यांच्या हस्ते करण्यात आला, तर शितोळे यांचा सत्कार कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्या हस्ते करण्यात आला. 

प्रमुख पाहुणे किशोर शितोळे यांनी बोलताना, भविष्य पाहायचे असेल तर इतिहास समजून घेतले पाहिजे. देशाला सक्षम प्रधानमंत्री मिळालेले आहेत म्हणून काश्मीर शांत आहे. देशाची प्रगती होत आहे, असे सांगितले. शिल्पा जिरांकलगी यांनी पद्य आणि वंदेमातरमचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी तर अमोल धाबळे यांनी आभार व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला अविनाश महागांवकर, शहाजी पवार, प्रकाश मोकाशे, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, सात्विक बडवे आदींसह अनेक मान्यवरांची गर्दी होती. हुतात्मा स्मृती मंदिरात श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, त्यामुळे सभागृहाबाहेर स्क्रीन, खुर्च्या आणि स्पिकरची सोय करण्यात आलेली होती. तेथेही रसिकांची गर्दी होती. तब्बल साडेतीन तास न पाणी घेता कुलश्रेष्ठ यांनी व्याख्यान दिले.

To Top