गुन्हे शोधक श्वान-कायरा 10 वर्षे सेवा बजावून सेवेतून निवृत्त

shivrajya patra
सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडील गुन्हे शोधक श्वान-कायरा, 10 वर्षे सेवा बजावून मंगळवारी कार्यालयीन वेळेनंतर सेवेतून निवृत्त झाले. बीजाने डॉबरमॅन अन् कायरा या नावाने सुपरिचीत गुन्हे शोधक श्वान स्वभावाने शांत अन् आदेशाचे तंतोतंत पालन करणे ही कायराची गुणवैशिट्यं म्हणून पाहिली गेली.

सोलापूर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडं, 09 डिसेंबर 2015 रोजी कर्तव्यावर दाखल झालेल्या श्वान कायरा याला श्वान प्रशिक्षण केंद्र गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे येथे 09 महिन्यांचं  प्रशिक्षण देण्यात आलेले होते.

सन 2019 मध्ये विजापूर रोड सोरेगांव येथे प्रसिध्द असलेले गजानन महाराज मंदिरामध्ये चोरी झालेली होती. त्याअनुषंगाने विजापूर नाका पोलीस ठाण्यात भा.द.वि.क. 457, 380 अन्वये गुन्हा दाखल होता. 

या मंदिराचे घटनास्थळी गुन्हे शाखेकडील श्वान- कायरा व पथक यांना पाचारण केले. त्यावेळी हँडलर पोह/420 दोरनाल यांनी मंदिरास लावण्यात आलेले व चोरांनी तोडलेल्या कुलुपाचा वास दिला. त्यावेळी कायरा श्वानाने गजानन मंदिरापासून 500 मिटर अंतरावर जाऊन एका मोकळ्या जागेच्या ठिकाणी जावून थांबले. 

त्या अनुषंगाने विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदारांनी त्या जागेचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यानुसार त्या ठिकाणाहून आरोपींचे मिळून आलेल्या वस्तूंवरून नमूदप्रमाणे दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आला होता. त्याप्रमाणे तत्कालीन पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) बापू बांगर यांनी श्वान कायरा व हँडलर पोह/420 दोरनाल व पोह/430 गवंडी यांना बक्षीस दिले होते.

सन 2022 मध्ये एम. आय. डी. सी. परिसरात मर्डरचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार भा.द.वि.क. 302 अन्वये दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळावरून संशयीत आरोपीची चप्पल जप्त करण्यात आली होती. त्यानंतर एम आय डी सी पोलीस ठाणे येथे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींना उभे करून त्यांची कायरा श्वानाद्वारे ओळख परेड घेण्यात आली होती. 

ओळख परेड दरम्यान सापडलेल्या चप्पलचा वास कायरा श्वानास देण्यात आला होता. त्याआधारे कायरा श्वानाने आरोपीची ओळख पटविली. अशा प्रकारे श्वान कायराने मालाविषयक व शरिराविषयक बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याकामी आजवर मदत केली आहे.

या सेवानिवृत्ती कार्यक्रमास पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने तसेच श्वान पथकाचे पोलीस अंमलदार स. फौ. लक्ष्मण गणगे, स. फौ. शिवानंद कलशेट्टी, पोह/श्रीकांत दोरनाल, पोह/संतोष गवंडी, पोह/संतोष आळंद, पोह/मोहसिन शेख, पोह/निलेश कारभारी, पोह/राजू राठोड, पोह/स्वामीराज बिराजदार आणि पोकॉ/अनंत कोकरे आदी उपस्थित होते.

To Top