नाशिक कुंभमेळा तपोवनातील वृक्षतोडीस संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी तपोवनातील कुठल्याही वृक्षाची तोड होणार नाही, याची काळजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री तसेच पर्यावरण खात्याने घ्यावी तथा यावर पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने एका निवेदनाद्वारे केलीय. हे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सुपूर्द करून ते राज्य शासनाकडं पाठविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलीय.
नाशिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी भारतातून वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात साधु-संत काही कालावधीसाठी येणार आहेत, पण येणाऱ्या साधु-संतांच्या राहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासाठी काही कालावधीसाठी सरकारच्या वतीनं, जी निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक तपोवनातील 1700 ते 1800 पूर्ण वाढ झालेली झाडांची तोड करण्यात येणार आहे. ते निश्चितच पर्यावरणाच्या दृष्टीने अनुचित आहे.
एकीकडे सरकार, 'झाडे लावा, झाडे जगवा' असा संदेश देण्याची जाहिरात करते अन् दुसरीकडे काही कालावधीसाठी येणाऱ्या साधू संतांसाठी निवासाची व्यवस्था करण्यासाठी इतिहासकालीन तपोवनातील नाशिकच्या भूमीतील झाडांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करते, हे कहणी आणि करणीतला विरोधाभास असल्याचे दिसते. 
श्रीरामाच्या अधिवासाने नाशिकची भूमी प्रसिद्ध आहे, त्या भूमीत श्रीराम हे या तपोवनात राहुटी करून राहिले होते. ज्या श्रीरामाचे नाव घेऊन हे साधु-संत या नाशिकच्या भूमीत कुंभ मेळाव्यासाठी येणार आहेत, त्यांच्यासाठी एसी व बांधलेल्या दगड मातीच्या निवासस्थानाची व्यवस्था हे सद्सद्विवेकाला पटत नसल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.
झाडांची कत्तल झाली तर भारतीय संस्कृतीचा कोणता संदेश जगाला देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असा सवाल करून ही झाडे लावण्यासाठी आपल्या किती पिढ्या जातील, याचं पूर्वानुमान घेणे अगत्याचे आहे. या तपोवनातील वनात किती तर साधुसंतांनी आपली तपश्चर्या या अगोदर पूर्ण केली असेल असे तपोवन नष्ट करणे, हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे, वृक्ष हे आपल्या सृष्टीतील एक महत्वाचा घटक आहेत. वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाने बेसुमार वृक्षतोड झाली आहे. सरकारची वृक्ष लागवड योजना पूर्णपणे फसल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महानगर प्रमुख शिरीष जगदाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
