मातंग कुंटुंबियावर सातत्याने अन्याय; दलित पँथरचे धरणे आंदोलन सुरू

shivrajya patra

सोलापूर : मागासवर्गीय मातंग पाटोळे कुंटुंबियावर सतत होत असलेल्या अन्याय-अत्याचार करणाऱ्या गांवगुंडावर कडक कायदेशीर कारवाई करुन पाटोळे कुटुंबियाना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी दलित पँथर चे जिल्हाध्यक्ष बंडू गवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (जुने) प्रवेशद्वारावर गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय.

अक्कलकोट येथील रहिवाशी वयोवृध्द विष्णू आन्याबा पाटोळे असून त्यांची पत्नी ही अर्धांगवायू या आजाराने त्रस्त असून औषधोपचार घेत आहे. पाटोळे यांना राहायला घरजागा नसल्याने त्यांनी शासनाकडे घरजागेसाठी मागणी केली असता, त्यांना अक्कलकोट येथील गांवठाण गट नं. ७०८ येथे जागा देण्यात आली. त्यावर त्यांनी पत्राशेड मारुन राहण्यास आहेत. 

वयोवृध्द असूनही मिळेल ते काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह व पत्नीचा औषधोपचार ते करतात. सदर शासनाकडून मिळालेल्या घरजागेबाबत परिसरातील गुंडप्रवृत्तीचा नागेश कुंभार नांवाचा इसम हा विष्णू पाटोळे यांना रोज संध्याकाळी कामावरुन येऊन दारात बसला असता, ये थेरड्या तुला फुकट जागा मिळाली, ही जागा माझी होती, ती तुम्हाला दिली म्हणून तुम्हाला लय मस्ती आलीय, असं जातीवाचक शिवीगाळी करीत असे. 

त्याने 17 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी विष्णू पाटोळे, त्यांच्या मुलाला अर्वाच्य शिवीगाळी करून लोखंडी रॉडच्या मारहाणीतील जखमी शिवाजी पाटोळे याला मारहाणीपासून न्याय मागण्यासाठी अक्कलकोट पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत आहेत, मात्र ते कुटुंब न्यायापासून कोसो दूर असल्याचे दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष गवळी यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात पोलिसांनी कधी बंदोबस्ताच्या तर कधी अधिकारी नसल्याच्या सबबीखाली गुन्हा दाखल करण्याच्या कामात टाळाटाळ केलीय. दरम्यान विष्णू पाटोळे याच्या मुलावर 07 ऑक्टोबर रोजी खोटा गुन्हा दाखल करून गुंतवण्यात आलंय. शेवटी पोलीस अधिक्षकांकडे तक्रारी अर्ज दिल्यावरही स्थानिक पोलिसांकडून कारवाई शून्य झाल्याचे दलित पँथरचे निवेदन आहे.

अक्कलकोट ग्रामीण सिंदखेड येथील गट क्र. 56/1 ही जमीन पुष्पा विष्णू पाटोळे यांच्या मालकी वहिवाटीची असून गट क्र. 55 चे मालक राजू तेली याने स्वतःचा गट सोलार कंपनीला भाडेतत्वावर देऊन गट क्र. 56/1 चा बांध फोडून अतिक्रमित क्षेत्रात गट क्र. 55 चा बोर्ड लाऊन राजू तेली दादागिरी करतोय तर पोलीस दिवाणी बाबीचं कारण पुढं करीत आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एखाद्या अदृश्य शक्तीचा दबाव आहे काय ? असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.

पाटोळे परिवाराचं जगणं असह्य केलेल्या सर्व गावगुंडावर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दलित पँथरने हलगी नाद आणि धरणे आंदोलन सुरू केलं आहे.

To Top