न्याय वैद्यक प्रयोगशाळा उपसंचालकास 'कारणे दाखवा' नोटीस; सोमवारी सुनावणी

shivrajya patra

सोलापूर : तब्बल एक वर्षाहून अधिक काळ कारागृहात खितपत पडलेल्या आरोपीच्या खटल्याची सुनावणी केवळ रासायनिक तज्ञाकडून जप्त मुद्देमालाची तपासणी होऊन अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे, उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापूर यांना कारणे दाखवा, अशी नोटीस काढण्यासंबंधी आरोपी पक्षातर्फे केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करुन उप संचालकांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सोमवारी, 03 नोव्हेंबर रोजीची तारीख नेमण्यात आलीय.

अत्याचार केल्याच्या आरोपात एक वर्षापासून कारागृहात खितपत पडलेल्या पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील श्रीराम शिंगाडे या आरोपीच्या खटल्याची सुनावणी तब्बल एक वर्षापूर्वी रासायनिक तज्ञाकडे पाठवण्यात आलेल्या जप्त मुद्देमालाची रासायनिक तपासणी होऊन मुद्देमाल परत न आल्याने आणि तपासणी अहवाल न आल्याने खोळंबून राहिलेली आहे.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी मुद्देमाल परत आणण्यासाठी नेमणूक केलेला स्पेशल कॉन्स्टेबल सोलापूर येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे जाऊन मुद्देमाल परत मिळण्याबाबत पत्र देऊन 03 महिने उलटून गेले, तरीही तज्ञांनी मुद्देमाल तपासणी करुन अहवाल दिला नाही आणि मुद्देमालदेखील परत केला नाही. 

त्यामुळे, आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी उपसंचालक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापूर यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करुन उपसंचालक यांना 'कारणे दाखवा' नोटीस काढून प्रकरण सुनावणीसाठी सोमवारी, 03 नोव्हेंबर रोजी नेमले आहे.

या खटल्यात आरोपतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. सिध्देश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड. वैभव सुतार, ॲड. किरण गवळी तर सरकारतर्फे ॲड. शेख काम पाहत आहेत.

... लवकरच याचिका दाखल !

खटल्याच्या सुनावणीविना अनेक आरोपी न्यायालयीन कोठडीत खितपत पडलेले आहेत. त्या आरोपींचे खटले त्वरीत चालवणेबाबत उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिलेले आहेत, परंतु केवळ रासायनिक तज्ञांचा अहवाल व मुद्देमाल न्यायालयात सादर न केला गेल्यामुळे अनेक खटल्याची सुनावणी प्रलंबित राहून अनेक कच्च्या कैद्यांना बंदीवासात राहावे लागत आहे. याबाबत उच्च न्यायालयात आरोपीतर्फे याचिका दाखल करण्यात येणार आहे.


To Top