सोलापूर : पोलीस स्मृति दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशभरात गेल्या वर्षभरात, जे पोलीस अधिकारी व अंमलदार हे कर्तव्य बजावीत असताना शहिद झाले. त्यांच्या बलिदानाचं स्मरण करण्याकरीता व श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता मंगळवारी, 21 ऑक्टोबर रोजी येथील शहर पोलीस मुख्यालयात शहीद बांधवांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.
देशभरात गेल्या वर्षभरात 01 सप्टेंबर, 2024 ते 31 ऑगस्ट, 2025 या कालावधीत 191 पोलीस अधिकारी व अंमलदार हे कर्तव्य बजावित असताना शहिद झाले. 
त्यांचे स्मरण करण्याकरिता व त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता मंगळवारी, 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 08.00 वाजता पोलीस मुख्यालय येथे पोलीस शहिद स्मृतिदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
21 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस उप निरीक्षक किरणसिंग यांच्या नेतृत्वात अक्साई चिनच्या दुर्गम भागात 16, 000 फुटावर असलेल्या हॉट स्प्रिंग्ज या ठिकाणी गस्त घालत असलेल्या आपल्या 10 जवानांवर चिनी सैनिकांनी अचानक हल्ला चढविला. 
या हल्ल्यात आपल्या 10 जवानांना वीरमरण आले. आपले कर्तव्य बजावत असताना या जवानांनी अतिशय शौर्याने शत्रुविरुध्द लढा दिला. 
या जवानांच्या हौतात्म्यांचे स्मरण म्हणून आजही दरवर्षी 21 ऑक्टोबरला देशभरातून प्रत्येक प्रातांचे प्रतिनिधीत्व करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून त्यांना आदरांजली वाहिली जाते. 
त्याचबरोबर देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्याविरोधात तर कधी समाज विघातक कृती करणाऱ्या विरोधात कारवाई करताना तर कधी कायदा व सुव्यवस्थेचे पालन निट व्हावे, म्हणून सतत जागरुकपणे आपली सेवा बजावताना, कर्तव्यात जराही कसुर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात कायम तेवत ठेवून श्रध्दांजली वाहण्यासाठी देशभरात पोलीस हुतात्मा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो.
यावेळी प्रमुख पाहुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (सोलापूर) डॉ. सुजित मिश्रा, पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस अधिक्षक (सोलापूर ग्रामीण) अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गौहर हसन, पोलीस उपायुक्त (परीमंडळ) विजय कबाडे यांच्यासह अन्य वरीष्ठ अधिकारी यांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. रापोनि बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना देण्यात आली. 
यावेळी सोलापूर शहर येथिल सर्व वरीष्ठ अधिकारी व अंमलदार, सोलापूर ग्रामिण पोलीस दल, केगांव पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. 10, सोलापूर येथील अधिकारी व अंमलदार तसेच शहिद जवानांचे कुटुंबीय व नागरीक उपस्थित होते.

