सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना नवरात्र महोत्सव कालावधीत जिल्ह्यातील मालासंबंधी गुन्ह्यांना प्रतिबंध करुन जिल्ह्याच्या अभिलेखावरील मोक्का, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील वॉंटेड तसेच फरारी असलेल्या आरोपींचा, अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपींची माहिती काढून कारवाई करण्यासंबंधी आदेशित केले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी त्यांच्या अधिपत्याखालील दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या. 24 सप्टेंबर रोजी सपोनि विशाल वायकर व त्यांच्या पथक मंगळवेढा उपविभागात हजर असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगताप यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा-पंढरपूर बायपास रोडवर रेकॉर्डवरील एका आंतरराज्य गुन्हेगारास सपोनि विशाल वायकर व त्यांच्या पथकानं सापळा रचून ताब्यात घेतले.
त्याच्याकडं अधिक चौकशी करता, त्याचं नांव विकास भिमशा भोसले (वय 55 वर्षे, रा. तामदर्डी ता. मंगळवेढा) असं असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या अंगझडतीमध्ये 01 देशी बनावटीचे पिस्टल आणि 02 जिवंत काडतूसे मिळून आली. त्याचा अभिलेख तपासले असता, तो मोक्का, दरोडा, जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्हयात 20 वर्षापासून 'वाँटेड' आरोपी असून त्यावर महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल असल्याचं पुढं आलं आहे.
अंतरराज्य आरोपी विकास भोसले हा मंगळवेढा, मंद्रुप पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी 02 आणि कामती पोलीस ठाण्याकडील 01 अशा 05 गंभीर गुन्ह्यात पाहिजे होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोकॉ/454 हरीष थोरात यांच्या फिर्यादीवरुन मंगळवेढा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल असून न्यायालयानं आरोपीस 05 दिवसाची पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सपोनि जोग या गुन्ह्याचा करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचं मार्गदर्शन अन् स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगताप यांच्या नेतृत्वाखाली सपोनि विशाल वायकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म. इसाक मुजावर, सफौ/ नारायण गोलकर, प्रकाश कारटकर, निलकंठ जाधवर, पोहेकॉ/ विरेश कलशेट्टी, मोहन मनसावाले, पोकॉ/ राहूल दोरकर, हरीष थोरात, अक्षय डोंगरे, सुनिल पवार, महिला पोकॉ/ दिपाली जाधव यांनी बजावली.
