अदनान कोथिंबीरे हे गाजीऊद्दीन अकादमीच्या भाषांतर विभागाचे काम पाहतात. यापूर्वी अदनान कोथिंबीरे यांनी अमेरीकेच्या अल्बामा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या गांधी-किग कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवला होता.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या वित्तीय पाठबळाखालील यंग साऊथ एशियन लीडर्स इनिशिएटिव्ह (YSALI) हा उपक्रम दक्षिण आशियातील उदयोन्मुख नेत्यांचेसशक्त नेटवर्क निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवला जातो. या माध्यमातून बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव या सात देशांतील युवक नेते परस्पर सहकार्याद्वारे प्रादेशिक आव्हानांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात.
या उपक्रमांतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का, ओमाहा (UNO) आणि ईस्ट-वेस्ट सेंटर (EWC) यांच्या सहकार्याने विविध स्तरांवर कार्यशाळांचे आयोजन केले जाते. YSALI तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. उद्योजकता, नागरी सहभाग आणि पर्यावरणीय प्रतिकारक्षमता. या कार्यशाळांमधून युवा नेत्यांना कौशल्यविकास, नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
YSALI उपक्रम सप्टेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आला असून, याअंतर्गत दक्षिण आशियातील पाच कार्यशाळा आणि अमेरिकेत एक कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दक्षिण आशियातील 18 ते 30 वर्षे वयोगटातील 420 दशलक्षहून अधिक युवकांना प्रभावी नेतृत्वासाठी सक्षम करणे, हा आहे.
दक्षिण आशियातील युवा नेतृत्वाचे सशक्त नेटवर्क तयार करणे, युवकांना सामायिक आव्हाने सोडवण्यासाठी सक्षम करणे, युवा नेत्यांना प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्व संघटनांशी जोडणे इत्यादी उद्दिष्टाकरिता युवा नेतृत्वाला तयार करण्यात येत आहे. भारताकडून एकूण 11 युवकांची निवड या कार्यशाळेसाठी करण्यात आली असून, त्यामध्ये गाजीऊद्दीन अकादमीचे सदस्य अॅडव्होकेट अदनान कोथिंबीरे यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल अॅड. कोथिंबीरे यांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे.
