सोलापूर : ' व्यापारासाठी घेतलेले दहा लाख रूपये व त्याचे व्याज २४ तासात दिले नाहीत तर तुला जिवंत सोडणार नाही ' अशा शब्दात सावकाराने दिलेल्या धमकीला घाबरून महिबूब कुरेशी यानं राहत्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी मृताची पत्नी तरन्नुम कुरेशी हिच्या तक्रारीनुसार सावकार जब्बार हसन शेख याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून एमआयडीसी पोलीस त्याच्या मागावर असल्याचे सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील मजरेवाडी, नई जिंदगी सिद्धेश्वर नगर भाग - 04 मधील रहिवासी महिबूब कुरेशी याने जब्बार शेख याच्याकडून त्याच्या व्यवसाय व्यापारासाठी दहा लाख रुपये व्याजाने घेतले होते. सध्या व्यवसायाला मंदीचा काळ असल्याने महिबूबने ठरल्याप्रमाणे सावकार जब्बारला व्याज आणि मुद्दलाची रक्कम ठरल्याप्रमाणे परत केली नसावी.
त्यामुळे जब्बार शेख याने महिबूब कुरेशी याला भ्रमणध्वनीवर कॉल करून मुस्लिम पाच्छा पेठेत बोलाऊन घेतले होते. त्यावेळी सावकार जब्बारने महिबुबला, 'उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत माझे घेतलेले पैसे व पैशाचे व्याज दे, अन्यथा तुझ्या घरी येऊन बघतो, व तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिली होती.
त्या धमकीबरोबरच सावकारी त्रासाला कंटाळून महिबूब यांनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृताची पत्नी तरन्नुम कुरेशी हिच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी जब्बार हसन शेख (रा- अमन चौक, नई जिंदगी, सोलापूर) याच्याविरुद्ध बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस उपनिरीक्षक गाढवे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
