चोरी-जबरी चोरीच्या वेगवेगळ्या उघड गुन्ह्यात ०२ महिलांसह ०७ जण गजाआड

shivrajya patra

०३ लाख रुपयाहून अधिक मुद्देमाल जप्त; मोहोळ पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी

मोहोळ/यासीन अत्तार : मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत चोरी व जबरी चोरी यांसारख्या गुन्ह्याचे प्रकार घडून गुन्हे दाखल झाले होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणुन प्रतिबंध करणेकामी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या आदेशानुसार मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी वेगवेगळे पथके तयार करून मालाविषयक उघडकीस आणलेल्या चोरी-जबरी चोरीच्या गुन्ह्यात ३ लाख रुपयाहून अधिक मुद्देमाल जप्त केला. त्यात २ महिलांसह  ७ आरोपींना गजाआड करण्यात आलंय.

३०, मे रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास सोलापूर ते पुणे जाणारे रोडलगत हॉटेल नंदनवन समोरील पानटपरीसमोर शशीकांत दाईंगडे (रा. दाईंगडेवाडी) गावाकडे जाणेसाठी थांबले असता, तिथं आलेल्या ३ अज्ञात इसमांनी त्यास शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करून ऊस तोडण्याच्या कोयत्याचा दाख दाखवून जबरदस्तीने दाईंगडे याच्या हातातील अंगठी व खिशातील रोख रक्कम काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले असल्याचा गुन्हा दाखल होता. 

या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथकाने घटनास्थळाचे व शहरातील सर्व सी. सी. टी. व्ही. तपासून त्यामधील आरोपीतांची ओळख पटवून व गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने या  गुन्ह्यात सोमनाथ धोंडीराम पोरे, राज मनोज पवार आणि विधीसंघर्ष बालक (तिघे राहणार पंढरपूर) येथील असल्याने .विधीसंघर्ष बालक वगळता उर्वरितांना गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम, अंगठी व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ही हस्तगत करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरीक्षक अजय केसरकर हे करीत आहेत.

मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत, ०३ जून रोजी रात्री  शेटफळ चौकात घडलेल्या घटनेत माळशिरस तालुक्यातील मेंढपाळ हे मेंढ्या घेऊन आले होते. त्यांच्या कळपातील मेंढ्या चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात सुनिल विजय भोसले (वय २१ वर्ष, रा. संगदरी, ता दक्षिण सोलापूर), करण दत्तात्रय गायकवाड (वय २४ वर्ष, रा. दहिवडी ता. तुळजापूर) आणि लक्ष्मण राजकुमार काळे (वय २५ वर्ष, रा. पाटकुल ता. मोहोळ) यांना अटक करून त्यांच्याकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेली मेंढरे हस्तगत करण्यात आली. 

या गुन्ह्याचा तपासात मोहोळ पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यातील शेळ्यांची चोरी  या आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेकडून या गुन्ह्यातील शेळ्या व गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आनंद सतीश शिंदे (रा. डोराळे ता. वैराग) हा फरार असून पोना/८६७ ढवळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

मौजे बिटले येथे यल्लमादेवीच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी गेल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात ननीता यासीनखान भोसले (वय- ३० वर्ष, रा. नेवासा जि. अहिल्यानगर, सध्या रा. पाथरूड ता. भूम), सुनिता नानासाहेब पंडीत (वय-३५ वर्ष, रा. पाथरूड ता. भूम) यांना अटक करून या गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. पोहेकॉ/१६९७ हेंबाडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर (सोलापूर विभाग), मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक अजय केसरकर, पोहेकॉ/दयानंद हेंबाडे, संदेश पवार, पोना/चंद्रकांत ढवळे, मपोना/मनिषा तरटे, पोकॉ/अमोल जगताप, स्वप्निल कुबेर, संदिप सावंत, रोहन पवार, योगेश खलाटे, सुनिल पवार, अविराज राठोड तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ/युसुफ पठाण यांनी बजावली आहे.


To Top