पोलिसांच्या छाप्यात लॉजच्या नावाखाली चालणारा कुंटणखाना उजेडात; तरूणीची सुटका

shivrajya patra

मोहोळ : लॉजच्या नावाखाली चालणारा कुंटणखाना पोलिसांच्या छाप्यात उजेडात आलाय. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्जुनसोंड पाटीजवळील आर्यन लॉजमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या महिला सुरक्षा शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला, त्यात एका महिलेची सुटका करण्यात आली असून लॉज मॅनेजरसह दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हा लॉज तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या मालकीचा असल्याचंही पुढं आलं आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील अर्जूनसोंड पाटीजवळ असलेल्या आर्यन लॉजवर महिला सुरक्षा शाखेचे अधिकारी-अंमलदारांनी बुधवारी, रात्री छापा टाकला. तिथं परभणी जिल्ह्यातील एक २५ वर्षीय तरुणी आढळली. लॉजचा मॅनेजर तिला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय चालवित असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. 

या प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलीस महिला सुरक्षा शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात, त्या तरूणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन तिच्या येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजिवीका करीत असताना मिळून आल्याने आर्यन लॉजचा मॅनेजर पंकज भास्कर पवार (वय-२९ वर्षे, रा. ढोक बाभुळगाव ता. मोहोळ) व वेटर रामचंद्र पांडूरंग भालेराव (वय-३५ वर्षे, रा. अण्णाभाऊ साठे नगर, मोहोळ) या दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली.

त्यानुसार मोहोळ पोलिस ठाण्यात उभयतांविरुध्द भा. न्या. सं. क. 143 (2), 144 (2), 3(5) स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 6 प्रमाणे गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


To Top