सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शनिवारी जागतिक योग दिनानिमित्त 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कॅडेटच्या सहाशे विद्यार्थ्यांसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग साधना केली. यावेळी विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान संकुलातील योग शिक्षकांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. 
भारताने संपूर्ण विश्वाला दिलेले योग साधनेचे ज्ञान संवर्धित करण्यासाठी, व्यापक प्रमाणात रुजवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यानिमित्त विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानामध्ये सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले होते. 
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांच्यासह 38 महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी कर्नल एम. डी. मुत्तप्पा, कर्नल देवानंद, सुभेदार ए. के. ठाकूर, कॅप्टन भीमाशंकर व्हनमाने, सुभेदार वाघमारे, संतोष कांबळे, राठोड आदी उपस्थित होते. 
या योगसाधना कार्यक्रमात डॉ. शालिनी मस्के आणि तृप्ती अवताडे यांनी योगाविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी योग शिक्षिका स्नेहल पेंडसे यांच्या विद्यार्थ्यांनी योग भक्तीचे नृत्य सादर केले. योगाच्या या कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
फोटो ओळी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शनिवारी जागतिक योग दिनानिमित्त 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कॅडेटच्या सहाशे विद्यार्थ्यांसह विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग साधना केली.
