युवकांनी पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधी समाजामध्ये करावी जनजागृती : मनपा आयुक्त डॉ. ओम्बासे

shivrajya patra

आयुक्तांच्या हस्ते पर्यावरण सेल्फी फोटो बुथचे उद्घाटन; जागतिक पर्यावरण दिनानिमित विशेष उपक्रम

सोलापूर : युवकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधी समाजामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोमवारी केले. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यावतीने महापालिकेच्या आवारात ठेवण्यात आलेल्या सेल्फी विथ पर्यावरण फोटो बुथच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. ओम्बासे बोलत होते.

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे हस्ते सोमवारी, सेल्फी फोटो बुथचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त किरणकुमार मोरे, सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, जनसंपर्क व कामगार अधिकारी अनिकेत वाघमारे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, केंद्रीय संचार ब्यूरोचे निवृत्त अधिकारी सतीश घोडके, पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर, राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशनचे व्यवस्थापक समीर मुलाणी आणि कार्यालय सहायक जे. एम. हन्नुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा सेल्फी फोटो बुथ आजपासून 05 जून, जागतिक पर्यावरण दिनापर्यंत लोकांसाठी सेल्फी काढण्यासाठी उपलब्ध असणार आहे. युवा वर्गामध्ये पर्यावरण सुरक्षा आणि संवर्धनबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सदर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

कार्यक्रमाला मनपा पर्यावरण विभाग, राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन अधिकारी, कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होते.

To Top