०२ देशी पिस्टल अन् ०३ जिवंत काडतूसांसह १२,०५,६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

shivrajya patra

०३ गुन्हेगार जेरबंद; सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची लक्षवेधी कामगिरी

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या लक्षवेधी कामगिरीत पोलीस रेकॉर्डवरील ०३ गुन्हेगारांना जेरबंद केलंय. त्यांच्याकडून जबरी चोरीचे ०४, वाहन चोरीचे ०३ आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये दाखल ०१ गुन्हा असे ०८ गुन्हे उघडकीस आणण्यात तपास पथकाला यश आलंय. त्यात देशी बनावटीचे ०२ पिस्टल, ०३ जिवंत काडतूसे, ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०२ कार, ०३ मोटार सायकली आणि ०३ मोबाईल फोन असा १२,०५,६०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लुटमार करून वाहने हिसकावून घेऊन निघून जाण्याच्या घटनांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशीत केले होते. 

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी-अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार सपोनि नागनाथ खुणे आणि त्यांचे पथक कार्यालयात हजर असताना, चैतन्य शेळके (रा. भोत्रा) त्यासोबत करण भोसले (रा. खांडवी ता. बार्शी) हे दोघे त्यांच्या कब्जात देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतूसे बाळगून बार्शी तालुका हद्दीतून चोरलेल्या MH 14 GA 4210 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने बार्शीकडून सोलापूर येथे येणार असलेची खात्रीशीर बातमी पोकॉ/ सागर ढोरे-पाटील व अक्षय डोंगरे यांना गोपनीय माहिती मिळाली. 

त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे यांनी त्यांचे पथकास सोलापूर-बार्शी रोडवरील कारंबा गांवच्या पुढे काही अंतरावर ते वाहन रोडच्या कडेला एका झाडाखाली उभे असलेले दिसले. त्याचा संशय आल्याने वाहनातील इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्याने त्याचे नाव चैतन्य उर्फ भैय्या पांडूरंग शेळके (वय २३ वर्षे, रा. भोत्रा, ता. परांडा) आणि करण शिवाजी भोसले (वय- २२ वर्षे, रा. खांडवी ता. बार्शी) अशी असल्याचे सांगितले. 

उभयतांच्या अंगझडतीत, त्यांच्या कब्जात ०२ देशी बनावटीचे पिस्टल आणि ०३ जिवंत काडतूसे मिळून आली. त्यांचे कब्जातील चारचाकी वाहनसंबंधी विचारलं असता, करण भोसले यांनं त्याच्या एका साथिदारासह कुईवाडी-बार्शी रोडवर रात्रीच्या वेळी एका चारचाकी वाहन चालकास पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून चोरून आणल्याचे सांगितले. 

त्यानंतर चैतन्य शेळके याच्या कब्जातील सोन्याचे लॉकेटसंबंधी विचारलं असता, करमाळा तालुक्यातील आवाटी येथील बाळूमामा मंदिराजवळ बसलेल्या इसमाच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट पाहून त्याच्या अन्य साथिदारास बोलावून घेऊन त्यास पिस्टलचा धाक दाखवून बळजबरीने काढून घेतल्याचे सांगितले. 

या आरोपीतांकडं मिळालेले पिस्टल मारूती नागनाथ माने (रा. सुकटा ता. भुम) यांनं विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आलीय. या ०२ आरोपीतांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण जिल्हा आणि तुळजापूर तालुका पोलीस ठाणेकडील खालील गुन्हे उघडकीस आले असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

...

पकडलेल्या आरोपीपैकी चैतन्य पांडूरंग शेळके (रा. भोत्रा) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यास मागील काही महिन्यापूर्वी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं. तो हद्दपारी आदेशाचा भंग करून त्याने परांडा पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याची तयारीचा गुन्हा करून त्याने त्याचे साथिदारांसह उपरोक्त गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झालंय. 

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, स.फौ. नारायण गोलेकर, पोह/धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोकॉ/सागर ढोरेपाटील, पोकॉ/अक्षय डोंगरे, महिला पोकॉ/सुनंदा झळके, चापोना/समीर शेख, तसेच मोहोळ पोलीस ठाण्याकडील अंमलदार दयानंद हेंबाडे, चंद्रकांत ढवळे, स्वप्निल कुबेर यांनी बजावली.

... चौकट ...

अपहरण करून खंडणी मागण्याचा होता उद्देश !

पकडलेल्या इसमांकडे मिळून आलेल्या पिस्टल व चारचाकी वाहनासंबंधी त्यांच्याकडे कसून चौकशी करता, पिस्टल आणि चारचाकी वाहनाचा वापर करून भविष्यात अपहरण करून खंडणी मागण्याचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. ही टोळी जेरबंद झाल्याने, त्यांच्या कृत्यास प्रतिबंध करण्यास पोलीसांना यश आलं असल्याचं सांगण्यात आलंय.

To Top