जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित साइकल रॅलीचे आयोजन

shivrajya patra

शाश्वत भविष्यासाठी सोलापूरकरांनी केली सायकलिंग

सोलापूर :  नियमित सायकल चालवल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. सायकल चालवल्याने वजन कमी होते, हृदय निरोगी राहते, स्नायू मजबूत होतात आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. आरोग्यासोबतच सायकलिंगमुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी होतो, ज्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे सरंक्षण होते, म्हणून प्रत्येकाने सायकलिंगला दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावे, असे आवाहन सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी केले.

भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन आणि सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी यादव बोलत होते.

यावेळी निवृत्त अधिकारी सतीश घोडके, रॉयल रायडर्स सायकलींग असोसिएशनचे अध्यक्ष अभिनय भावठाणकर, निवृत्त जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे, पर्यावरण विभागाचे व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर आणि कार्यालय सहायक जे. एम. हन्नुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाश्वत भविष्यासाठी सायकलिंग ही यावर्षीची जागतिक सायकल दिनाची संकल्पना आहे. सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव आणि पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांचे हस्ते सकाळी ६.३० वाजता महापालिकेच्या आवारातून हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅली सुरु करण्यात आली. 

सोलापूर महापालिका, पार्क चौक, सरस्वती चौक,  शिवाजी महाराज चौक, एकेरी वळण, नवी पेठेत प्रवेश, लकी चौक, हुतात्मा बगीचा रस्ता, पार्क चौक, डफरीन चौक वळण परत सोलापूर महापालिका आवार येथे समारोप करण्यात आला. 

सायकलिंगच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २०१८ पासून दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकाकडून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. यामध्ये सोलापूरकरांनी सहकार्य करावं, असे आवाहन पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांनी केले.

यावेळी उपस्थित सायकल प्रेमींना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामध्ये पराग दोशी, सुबोध जंगे, सुरेश बालगावकर, श्रीधर वडनाल, राजकुमार बिंगी, अशोक बिराजदार, तुकाराम क्षीरसागर, सत्यनारायण दिकोंडा, गोवर्धन जोशी, सौ. अंजली शेंडगे, सौ. प्रेषिता चपळगांवकर, विष्णू गोसकी, किरण भीमर्थी, शेखर वडीशेरला, संजय करवंदे, महेश कासार, प्रथमेश कुमठेकर, श्रीकांत मामुरे, दत्ता ढोणे, अनंत चिटकूल, इरप्पा स्वामी, नितीन चपळगांवकर, अंकिता भावठाणकर, तुकाराम कडमनची, चंद्रशेखर गायकवाड आदि सायकल प्रेमींनी भाग घेतला होता.

To Top