पंचनामे पूर्ण; शेतकऱ्याकडून ' शिवराज्य पत्र ' चं कौतुक
कासेगांव/संजय पवार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव इथं गुरुवारी, २९ मे च्या रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा तडाख्यात शेतकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. कासेगाव मधील शेतकरी नारायण धर्मा चौगुले यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने साठवणुकीसाठी ठेवलेल्या कांद्याचं भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जनावरांचा गोठाही पडल्याने जनावरं कुठे बांधायची अशी अवस्था या भागातील शेतकऱ्यांची झाली.
गेल्या पंधरवड्यात या भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडतो आहे. नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. परवा झालेल्या पाऊस हा जवळपास 85 ते 90 मिलिमीटर पडल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं, पाऊस एवढा मोठा होता की, काल रात्रीपासून ते आज दुपारी एक वाजेपर्यंत कासेगाव ते बिरोबा वस्ती व कासेगाव चे उळेगाव , कासेगाव वडजी या रोडवरील वाहतूक पूर्णतः बंद होती
याबाबत माहिती देताना नुकसानग्रस्त शेतकरी नारायण धर्मा चौगुले यांनी सांगितले की, माझा उन्हाळी कांदा 80 ते 90 गोण्या नुकताच काढून मी पाऊस पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी गाय गोठ्याच्या मध्ये टाकला होता, परंतु वादळी वाऱ्यासह झालेले पावसामुळे हा गोठा पूर्णतः खांबानिशी उन्ममळून पडला. त्यात संपूर्ण कांदा भिजून नुकसान झाले.
एक तरी कांदा पिकास योग्य असा भाव नाही, त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात दररोज अवकाळी चा तडाखा या भागाला बसला होता, दरम्यान दक्षिण सोलापूर तहसील प्रशासनाने संबंधित भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश काल ताबडतोब देण्यात आले. 
यावरून गाव कामगार तलाठी आरीफ हुडेवाले, सहाय्यक सागर सुतार, हमीद शेख यांच्या टीमने प्रत्यक्ष भिजलेल्या कांदा पिकाची अवस्था व गोठ्याची अवस्था पाहून संपूर्ण पंचनामे आज करून घेण्यात आले. याचबरोबर गुरूलिंग चौगुले, प्रमोद उपाख्य सरकार पाटील, श्रीकांत पाटील, भगवान चौगुले यांच्या आंबा पिकाचे पाहणी करून पंचनामे केले. महालिंग चौगुले यांच्या शेतातील नुकसानग्रस्त कांदा पिकाची पाहणी करून पंचनामे करण्यात आले, संबंधितांना योग्य तो नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशा शब्दात गांव कामगार तलाठी हुडेवाले यांनी आश्वासित केले.
या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या व्यथेला 'शिवराज्य पत्र' ने ताबडतोब स्पर्श केला होता, ते विदारक चित्र पाहून प्रशासनास जाग आली होती. यामुळे शेतकरी नारायण धर्मा चौगुले, सरकार पाटील, महालिंग चौगुले इत्यादींनी ' शिवराज्य पत्र ' च्या टीमचे अभिनंदन केलं आहे. आमची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम बनल्याचं त्यांनी सांगितलं.
या भागातील पाझर तलाव, नाले-बंधारे, ओढा-नदी तुडुंब भरून गेली. बारा दिवस होत आहेत जवळपास या भागात गेल्या पंधरा दिवसापासून 250 ते 300 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागाने नोंदविण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
गेल्या दोन दिवसापासून या भागातील पाऊस थांबल्याने खरिपाच्या मशागतीला उद्यापासून सुरुवात होईल, असं सांगितलं, दरम्यान किमान एक आठवडाभर तरी पावसाने उसंत घेतली तरच खरिपाचा पुढील हंगामातील पेरण्या पूर्ण होतील, अशी शेतकऱ्यांनी सांगितले.
