Type Here to Get Search Results !

RTO असल्याचं भासवून वाहनांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीतील 02 आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केला बनावट RTO वाहनासह मोबाईल आणि रोख असा 11, 58, 000  रुपयांचा मुद्देमाल 

बीड : बायपास रोडवर 02 तरुण गणवेश धारण करुन परिवहन विभागाचा लोगो व कार्यालयात वापण्यात येणाऱ्या हुबेहूब दिसणाऱ्या स्कॉर्पीओ वाहनाचा वापर करुन लोकसेवक असल्याचा बनाव करुन बेकायदेशीरपणे लोकांकडून पैसे वसुल करीत तक्रारीवरून बीड पोलिसांकडे गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं RTO असल्याचं भासवून वाहनांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीतील 02 आरोपींना जेरबंद केलंय. उभयतांच्या ताब्यातून 11, 58, 000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बीड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गणेश जयराम विघ्ने यांनी गुरूवारी, 08 मे रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात, बायपास रोडवर गणवेशात हुबेहुब RTO सदृश्य वाहन सोबत घेऊन वाहन चालकांकडून पैसे उकळत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध क.204, 318(4), 205, 126(02) भादंवि प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली होती. 

या गुन्हयांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना निर्देश दिले होते. त्यावरुन पो.नि. शेख (स्था.गु.शा.)यांनी अधिनस्त ग्रेपोउपनि तुळशिराम जगताप यांचे पथकास तात्काळ पाचारण करुन आरोपी शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले. 

फिर्यादीतील आर.टी.ओ. वाहनाप्रमाणे दिसणारी स्कॉर्पीओ वाहनाचा बीड जिल्ह्यात गोपनिय माहितीद्वारे माहिती घे३न खात्रीलायक माहितीअंती RTO सारखीच पूर्णपणे दिसणारी गाडी पोलीसांनी दोन आरोपीसह ताब्यात घेतले. त्यातील एक इसम हा आर.टी.ओ.चे गणवेशात दिसून आला. 

त्याचे टोपीवर मपोसे नावाचा बॅच लावलेला होता. त्याचे उजव्या खांद्यावर दोन स्टार व डाव्या खांद्यावर एक स्टार तसेच दोन्ही खांद्यावर मपवि(महाराष्ट्र परिवहन विभाग) असे बॅच लावलेले होते. त्या दोघांना वाहनाचे खाली उतरुन विचारपूस केली असता, त्यांनी प्रारंभी आम्ही वडाळा येथे नेमणुकीस असल्याची सांगितले.

त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने पकडला. उभयतांची त्यांची नावे विचारली असता त्यांची नावे अजय बालाजी गाडगे (वय-24 वर्षे, रा.अम्रत नगर, घाटकोपर, मुंबई.) आणि दिनेश मंगल धनसर (वय-38 वर्षे रा. कलीना, मुंबई) असे सांगितले. 

त्यातील अजय गाडगे यास गुन्ह्यासंबंधी कसून विचारपूस केली असता त्यांने सांगितले की, तो कोणत्याही शासकीय पदावर कार्यरत नाही,  मागील 10 दिवसांपूर्वी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी विकत घेतली होती, त्या स्कॉर्पिओ वाहनाला हुबेहूब आर.टी.ओ. कार्यालयात वापरात येणाऱ्या वाहनासारखे बनविले व आर.टी.ओ. सारखे कपडे शिवून घेवून ते परिधान करुन त्याच्या नात्यानं भाऊजीसोबत 02 दिवसांपासून घाटकोपर येथून निघून नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर व बीड येथे वाहन अडवून मी आर.टी.ओ. असल्याचे  भास वून त्यांची फसवणूक करुन त्यांच्याकडून रोख व ऑनलाईन रक्कम घेतली असून गुन्हा केल्याचे कबूल केलं आहे. 

या आरोपींच्या ताब्यातून रोख 43, 000 रुपये, 04 मोबाईल, 01 बनावट आर. टी. ओ. स्कॉर्पीओ वाहन असा एकूण 11, 58, 000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन (बीड ग्रामीण) यांच्या ताब्यात देण्यात आलेलं असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.

ही कामगिरी नवनीत काँवत, सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड,  पोलीस निरीक्षक उस्मान शेख (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील ग्रे. पो. उपनिरीक्षक तुळशिराम जगताप, पोह/मनोज वाघ, कैलास ठोंबरे, विकास वाघमारे, चालक पोह/शिवाजी खवतड व गणेश विघ्ने (मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड)  यांनी संयुक्तपणे पार पाडली.