११ वा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दोन दिवसीय योग शिबीराचे उद्घाटन
रिमझिम पावसात युवकांनी केला योगाभ्यास
सोलापूर, दि २३ : तपश्चर्या आणि आत्मसंयमाने शरीर निरोगी आणि मन शांत होते. आणि यासाठी एक प्रमुख माध्यम म्हणजे योग आणि खेळ. घर असो वा कार्यालय, शाळा असो वा उद्यान, आपल्याला व्यायाम हा जीवनाचा एक भाग बनवावा लागेल, असं प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी येथे शुक्रवारी केले.
२१ जून रोजी होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्यूरो, सोलापूर आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथील शासकीय मैदानात सकाळी ०६ ते ०८ वाजेपर्यंत आयोजित दोन दिवसीय योग अभ्यास शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती सिंह बोलत होत्या.
यावेळी सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, नीर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष हेमंत जाधव, न्यू जॉगर्स फौंडेशनचे अध्यक्ष संतोष आरवत्तु, उद्योजक वीरेश नसले, निवृत्त अधिकारी सतीश घोडके, ज्येष्ठ पत्रकार अजितकुमार संगवे, योग सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील आळंद, विवेकानंद केंद्राचे नंदकुमार चितापुरे, स्वामी समर्थ अकॅडमीचे रवी राठोड, विराट स्पोर्ट्सचे सूर्याजी लिगाडे, सिद्धेश्वर करिअर अकॅडमीचे अतुल शिंदे आणि माजी अध्यक्ष संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती सिंह म्हणाल्या, योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. नियमित योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते.
या योग दिनानिमित केंद्रिय संचार ब्यूरोच्या @CBCSolapur या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम हँडलवरून दररोज एक योग आसनांची चित्र व मजकुरासहित माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे योग सराव करण्यास मदत होणार आहे. तसेच शिबिराच्या विविध ठिकाणी योगासनांची माहिती मोबाईलवर मिळवण्यासाठी क्यू आर कोड लावण्यात आले आहे. तसेच हे योग शिबीर दोन दिवसीय असून उद्या दिनांक २४ मे रोजी देखील युवकांनी मोठ्या उत्साहाने योग शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंबादास यादव यांनी प्रास्ताविकेतून केले.
शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. जितेंद्र महामुनी यांनी शंखध्वनीने योग शिबिराची सुरुवात केली. आयुष्य मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे योग सेवा मंडळाचे योग गुरु मनमोहन भुतडा यांनी योगासनांची माहिती दिली.
लता माळगे, वासुंती निंबाळकर, कालिदास कोंडा यांनी शिथिली करण्याचे व्यायाम, उभी व बैठे योगासने, पोटावरील व पाठीवरील योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणाची प्रात्यक्षिके आणि सराव करून घेतले.
उद्या शनिवारी, २४ मे रोजी सकाळी ६ ते ८ यावेळेत विवेकानंद केंद्राचे रवी कंटली आणि त्यांचे सहकारी योग अभ्यास घेणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास यादव यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी कोंडाबत्तीन हिने केले. नरेंद्र पवार यांनी उपस्थितांचं आभार मानले.
यावेळी केंद्रीय संचार ब्यूरोचे कार्यालय सहायक जे. एम. हन्नुरे, साईराज राऊळ, मनोज जखेटिया, काशिनाथ औरसंग, गुरुलिंग प्रचंडे, पंकज वाघमोडे, रफिक शेख, योगीराज कोंडाबत्तीन, योग सेवा मंडळाचे विद्या होनमोडे, संतोष सासवडे, दत्तगुरू वेदपाठक, सुजाता बिडकर, सुभाष जोशी आणि समर्थ करिअर अकॅडमी, प्रार्थना अकेडमी, सिद्धेश्वर अकॅडमी आणि विराट स्पोर्टस अकॅडमीचे शिक्षक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.