धामोरी/प्रतिनिधी : कोपरगांव तालुक्यातील धामोरी येथील चास-नळी वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र धामोरी प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यालगत नवनाथनगर विभागात वैद्यकीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध प्रकारच्या झाडाझुडपांच्या, वेलींच्या गुरफट्यात येथील वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्र जणू अदृश्य झाल्यागत अवस्था आहे. आरोग्य केंद्र या स्थितीला जाईपर्यंत येथील वैद्यकीय अधिकारी काय करित होते, असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
हे वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा असे म्हणण्यासही काही वावगे ठरणार नाही, येथील वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्य तपासणी मोहीम, पल्स पोलीओ मोहिम असे विविध तपासणी मोहीम कधी असते, कधी होऊन जाते, नागरिकांना याचा थांगपत्ता लागत नाही.
तरी संबंधित ग्रामपंचायत विकास अधिकारी, वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, अधिकारी तसेच धामोरी उपकेंद्र वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सुविधा पुरविणे आणि आरोग्य केंद्र उघडण्याची व बंद करण्याची ही वेळ निश्चित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
