सोलापूर : महाराष्ट्र राज्य लिपिक संवर्ग संघटना, पुणे शाखा सोलापूर च्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी सोलापूर कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
सुधारित आकृतीबंध मध्ये लिपिक संवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध आयुक्तालय ते क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील कोणतेही पद कमी न करता संघटनेने सुचवलेल्या किफायतशिर व आर्थिक बचतीच्या प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात यावी. लिपिक संवर्गातील पदोन्नती स्तर कमी करण्यासाठी सुधारित आकृतीबंधमध्ये सहाय्यक अधीक्षक पद सुधारित मागणीनुसार कक्ष अधिकारी गट ब कनिष्ठ या पदांमध्ये समाविष्ट होण्याबाबत व पदनामात बदल करण्यात मान्यता देण्यात यावी, लिपिक संवर्गीय अधिकाऱ्याचे सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करावे, लिपिक संवर्गीय प्रति नियुक्तीची पदे चिन्हांकित होऊन त्यास मान्यता देण्यात यावी. वरिष्ठ लिपिक पदे 100 टक्के पदोन्नतीने भरण्यासंबंधी सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात यावा, सहाय्यक प्रशासन अधिकारी हे पद 75 टक्के पदोन्नतीने व 25 टक्के सरळ सेवेने भरण्याबाबत सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात यावा, इत्यादी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हा लिपिक संघटना जिल्हाध्यक्ष गौरीशंकर होनमुटे, कार्याध्यक्ष शिवाजी सुरवसे, जीवन मद्रासी, श्रीमती कांचन इंगोले, श्रीमती रेश्मा पवार, श्रीमती विभुते, अधीक्षक उडानशिवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
02 जूनपासून लेखणी बंद आंदोलन
मागण्यांची दखल घेतली नाही, तर 02 ते 04 जूनपर्यंत लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे, तसेच 05 जूनपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
