धामोरी/प्रतिनिधी : हल्ली खेडोपाडी नागरीकरणाचा वेग वाढल्याने कुठलीही नवी बाब ही शहराबरोबरच किंबहुना अगोदरच गावांमध्ये लवकर अणुकरणशील ठरते. त्यात सोशल मिडियाचा वापर गावातील तरूणाईत मोठ्या प्रमाणात वाढल्यानं त्यात वेगळे काही दाखवण्यासाठी काहीही करायला धजावतात. त्यात तरुणाईची व्यसनाधीनता गंभीर बाब डोकं वर काढत आहे. त्यातच गर्दीच्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. याकडं वेळीच गांभीर्यानं लक्ष दिले गेले पाहिजे, अशी सामान्य जनतेची मागणी जोर धरीत आहे.
त्यातून मद्यपान आणि नशेच्या धुंदीत काहीही करण्याची गुर्मी युवकांमध्ये घातक ठरत आहे. लहान-लहान गावात मद्यपान केलेले युवक शैक्षणिक ठिकाणे, बाजारतळ, बसस्थानक, रिक्षा स्टॅंड किंवा गर्दीच्या ठिकाणी महिला-युवतींची छेड काढण्याचं प्रकार घडत असतात. या मद्यधुंद रोडरोमिओंचा व शोर शराबींचा कोहराम तरूणांचा सुळसुळाट अजूनच वाढत जाईल. ही समस्या सामाजिक स्वरूप धारण करीत आहे.
धामोरी हे गाव आकारमानाने व लोकसंख्येच्या मानाने मोठं गांव म्हणून गणले जाते. त्यातच आसपासच्या सात-आठ गावांचा संपर्क साधलं जाणारं गांव म्हणून पाहिलं जातं. अशा या धामोरी गावात विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्याही भरपूर आहेत. विद्यालय ते बसस्टॅडं परिसरात असून तेथेच या मद्यधुंद रोडरोमिओंचा सुळसुळाट पहावयास मिळतो.
त्या परिसरातील गावातील व्यावसायिक, दुकानदार अक्षरशः मेटाकुटीस आले आहे. मद्यपान केलेल्या या रोडरोमिओंची तक्रार दाखल व नोंदविण्यासाठी सर्वसाधारण माणूस तयार होत नाही. उगीचच कोर्ट-कचेरी नको, असे म्हणत कानाडोळा करतात, अन् त्याचाच गैरफायदा हे मद्यपीबरोबर रोडरोमिओ घेत आहेत, असं दिसते.
तरी संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक पुढारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत विकास अधिकारी, पोलिस प्रशासकीय अधिकारी यांनी या मद्यपी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी येथील व्यावसायिक, दुकानदार, महिला बचत गट व त्रस्त नागरिकांमधून मागणी केली जात आहे.