सोलापूर मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांची एनटीपीसी सोलापूर येथील GEM-2025 कार्यशाळेला भेट.
सोलापूर : सामाजिक जबाबदारी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी एनटीपीसी राबवित असलेले उपक्रम आणि त्याप्रती असलेल्या वचन बद्धतेचे कौतुक करताना अशा उपक्रमांमुळे समताधिष्ठित समाज घडण्यास मदत होते, असं प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केले.
एनटीपीसी, सोलापूरला प्रमुख सीएसआर उपक्रम "गर्ल एम्पॉवरमेंट मिशन ( GEM)" मधील सहभागींशी संवादासाठी शनिवारी, २४ मे रोजी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आले होते. एनटीपीसी सोलापूर चे कार्यकारी संचालक बी. जे. सी. शास्त्री आणि स्टेशनचे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉ. ओंबासे यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या निमित्ताने त्यांचं स्वागत करण्याचा सन्मान लाभला.
त्यांना GEM कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम चार आठवड्यांचा निवासी उपक्रम असून, वंचित पार्श्वभूमीतील मुलींच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करतो. यात जीवन कौशल्य प्रशिक्षण, शैक्षणिक प्रबोधन आणि व्यक्तिमत्व विकास यांचा समावेश असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले.
GEM मध्ये सहभागी झालेल्या मुलींना त्यांनी मोठे स्वप्न पाहण्याचे आणि त्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. "असे उपक्रम परिवर्तनशील असतात; ते आत्मविश्वास निर्माण करतात, महत्त्वाकांक्षा पेटवतात आणि भविष्याचे नेते घडवतात," असेही डॉ. ओंबासे यांनी यावेळी बोलताना म्हटले.
या भेटीत GEM मुलींनी कार्यक्रमामुळे त्यांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल सांगणारी मनोगते सादर केली. आयुक्तांच्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी शब्दांनी सहभागी मुलींवर सखोल प्रभाव टाकला.
एनटीपीसी सोलापूर समावेशी प्रगती आणि सामाजिक समतेसाठी असं अर्थपूर्ण आणि प्रभावी सीएसआर उपक्रम राबविण्यास वचनबद्ध आहे. डॉ. ओंबासे यांच्या भेटीमुळे मुलींच्या सबलीकरणाच्या या प्रवासाला नवीन प्रेरणा मिळाली असल्याचे दिसून येत आहे.
