रविवारी चर्मकार वधू-वर पालक परिचय मेळावा ; तीन राज्यातून 600 वधू-वरांची नोंदणी

shivrajya patra

♦️मेळाव्यास 1000 समाज बांधव उपस्थित राहणार : राजशेखर जेऊरकर 

सोलापूर/प्रशांत गायकवाड : चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने रविवारी,01 जून रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून 1 हजार समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे. या वधू-वर मेळाव्यात 600 वधूवरांची नोंदणी झाली असल्याची माहिती कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. 

चर्मकार समाज विकास मंडळ, सोलापूरच्या वतीने चर्मकार समाजातील उपवर वधू-वर, घटस्फोटीत, विधवा, विधूर आणि दिव्यांग वधू-वरासह पालक परिचय मेळावा जुळे सोलापुरातील जगदीश श्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. 

या मेळाव्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून समाजबांधवांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातून 500 वधू-वरांनी तर अन्य राज्यातून 100 वधू-वराची नोंदणी केली आहे. 

महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, सातारा, अहिल्यादेवी नगर, नाशिक, लातूर, धाराशिव, अकोला, बीड यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. कर्नाटकातील इंडी, विजापूर, बेळगांवी, बागलकोट येथून नोंदणी झाली आहे. या मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर, हरिदास टोणपे, वामन धुळगांव यांनी सांगितले.

या मेळाव्यासाठी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक हरिदास टोणपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, असंही आयोजक राजशेखर जेऊरकर यांनी म्हटले.

यावेळी चर्मकार समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले. 

या पत्रकार परिषदेस दत्तात्रय शिंदे, श्रीकांत मब्रुखाने, परशुराम शिंदे, शिवपुत्र हवाळकर, अंबादास हरवाळकर, अंबादास चाबुकस्वार, सुधीर बनसोडे, सदाशिव कांबळे, संगीता शिंदे, राजश्री खडतरे, सुनिता वनस्कर आणि पौर्णिमा धुळराव यांच्यासह आयोजन समितीतील अन्य सदस्य उपस्थित होते.

... चौकट ...

पालकांकडून एक रुपया घेता वधू-वर सूचक मेळाव्याचं आयोजन

चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी वधू-वर आणि पालकांकडून एकही रुपया घेण्यात आलेला नाही. त्याचबरोबर मेळाव्या दिवशी जेवणाची मोफत सोय मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे, हा संपूर्ण मेळावा विनामूल्य आहे.

राजशेखर जेऊरकर, प्रमुख आयोजक.

.......

To Top