कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर तर्फे कृषि तंत्रज्ञान प्रसारासाठी 25 दिवसांचे अभियान

shivrajya patra

सोलापूर : केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे तर्फे संपूर्ण भारत देशात खरीप हंगामपूर्वी शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची जनजागृती गावोगावी जाऊन करण्यासाठी विकसित कृषि संकल्प अभियान या भव्य कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी, 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत कृषि विज्ञान केंद्र सोलापूरच्या कार्यक्षेत्रामध्ये करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शबरी कृषि प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर कार्यक्षेत्रातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा व बार्शी तालुक्यातील 90 ते 100 गावांमधून या अभियानादरम्यान विविध मार्गदर्शन शिबीरे, चर्चा सत्रे, पध्दत प्रात्यक्षिके, शासकीय योजनांची माहिती, नैसर्गिक शेती, ड्रोन प्रात्यक्षिके नाविन्यपूर्व पध्दतीने तंत्रज्ञान प्रसार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कालावधीत कृषि विज्ञान केंद्र सालापूर येथील अधिकार्‍यांच्या दोन टीम कृषि तंत्रज्ञान प्रदर्शनयुक्त रथाच्या माध्यमातून कृषि विज्ञान केंद्राचे व इतर संशोधन संस्थाचे शास्त्रज्ञ, प्रत्यक्ष कृतीतून कृषि तंत्रज्ञान माहिती व गावातून प्रत्यक्ष शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.

यामध्ये खरीप हंगामातील पिकांना तसेच पशुधनासाठी उपयुक्त असणारे तंत्रज्ञान सांगणे यामध्ये माती व पाणी परिक्षण त्यानुसार खत व्यवस्थापन, मृदा आरोग्य पत्रिका, किड नियंत्रण, जैविक शेती/नैसर्गिक शेती, शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञनाचा वापर, ड्रोनद्वारे फवारणी, कृषि विभागाच्या विविध योजना, शेतकर्‍यांचे अनुभव, त्यांनी करत असलेल्या नावीन्यपूर्ण बाबींच्या नोंदी इत्यादी विषयांचा समावेश यामध्ये असणार आहे.  यावेळी शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांचा चमू शेतकऱ्यांना माहिती देईल, तसेच त्यांच्या शंकाचे समाधान करतील.

या अभियानाचे उद्घाटन सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार अशिर्वाद यांचे शुभहस्ते व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले, आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक डॉ. कांतप्पा खोत यांचे प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, 29 मे रोजी सकाळी 9.00 वा बोरामणी येथे होणार आहे. 

त्यावेळी कृषि तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी विशेष कृषि रथाचे आयोजन केले आहे. सदरील रथाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच शहर उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे  इत्यादी मान्यवर पुढे सुरू राहणाऱ्या अभियानामध्ये त्यांच्या वेळेप्रमाणे सहभागी होणार आहेत. 

या अभियानामध्ये 15 दिवस तज्ञांच्या चमु सोबत हा रथ 5 तालुक्यातील 90 ते 100 गावातून माहिती प्रसारणासाठी फिरणार आहे.  तरी शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा, असे अवाहन कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब रा. तांबडे यांनी सर्व शेतकरी बांधवाना केलं आहे.


To Top