सोलापूर : सोलापूर शहरातील आयटी क्षेत्रातील व्यावसायिक व उद्योजकांच्या समवेत सोलापूर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी संवाद साधत शहरातील सध्याच्या आयटी क्षेत्रातील व्यवसाय वाढीसाठी असणार्या संधी व अडचणीसंदर्भात चर्चा केली.
या बैठकीला डॉ. राजीवकुमार मेंते, डॉ. नरेंद्र काटीकर, सोलापूर सोशल फाउंडेशन मुख्य समन्वयक विजय पाटील, शाम येमूल, हर्षदा महाजन, प्रियांका स्वामी, अमृता बडे, प्रा. प्रतिभा येळगी, सोमशेखर आळंद, अमोल काळे, शशांक देशपांडे, तपन मंगेपल्ली यांच्यासह, विविध आयटी व्यावसायिक, प्राध्यापक उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थितांचे आयटी क्षेत्रातील सध्याचे अनुभव व शासन स्तरावर अथवा व्यवसाय वाढीसाठी काय आवश्यक आहे, याबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी सोलापूर शहरात कार्यरत असणार्या आयटी कंपन्या व उत्तीर्ण होणारे विद्यर्थ्यांमध्ये समन्वय साधने, सोलापूरमधील कार्यरत आयटी कंपन्यांमध्ये स्टाफ भरतीसाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करणे, आयटी क्षेत्रातील कार्यरत कर्मचार्यांच्या विकेंडसाठी सोलापुरातील पर्यटन वाढीस प्रोत्साहन देणे, आयटी कंपन्यांच्या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादित मालाला ऑनलाइन प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, शहर व जिल्ह्यातील प्रसिद्ध स्थळांचे मार्केटिंगसाठी स्वतंत्र ऍप विकसित करणे, शहरात छोट्या-छोट्या आयटी कंपन्या रजिस्टर करून रोजगार उपलब्ध करून देणे, आयटी व्यवसायात आर्थिक गरजेसाठी बँकांचा सपोर्ट मिळवून देणे, इंजिनियरिंग झालेला विद्यार्थ्याला सोलापूरमध्येच नोकरी करेल, यासाठी कार्यशाळा आयोजित करणे आदी विषयांवर आ. देशमुख यांनी व्यावसायिकांशी सविस्तर चर्चा केली.
*** चौकट***
...सोलापुरातच रोजगार निर्मिती करण्यासाठी घ्यावा पुढाकार : आमदार सुभाष देशमुख
सोलापुरातील तरूणांनी सुधा मूर्ती यांचे उदाहरणं डोळ्यासमोर व्यवसायात काम करायला हवे. सोलापूरची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, सोलापुरातील तरुणांसाठी सोलापुरातच रोजगार निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जास्तीत-जास्त रोजगार निर्मिती करावी, असं आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
