सोलापूर : रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांनी जमा केलेले पैसे कंपनीच्या खात्यात न भरता रोखपालाने स्वतःच्या खात्यात भरून ३६, ९७, ५०० रूपयांची अफरातफर केलीय. ही घटना रामवाडी येथील कॅन्सर सेंटरमध्ये जुलै २०२४ ते आजमितीदरम्यान घडली. याप्रकरणी डॉ. प्रमोद कालीदास टिके यांच्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात चंद्रशेखर म्हेत्रे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झालाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील ओल्ड एमआयडीसीतील अटलांटिस को. हौसिंग सोसायटीतील रहिवासी डॉ. प्रमोद कालीदास टिके (वय ४३-वर्षे) यांचं कॅन्सर सेंटर नावाचं हॉस्पिटल आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्यावर असलेला विश्वासाचा गैरफायदा घेऊन चंद्रशेखर म्हेत्रे याने संस्थेची फसवणूक, विश्वासघात करण्याचे उद्देशाने फसवणूक करत असताना हिशोबामध्ये अफरातफर करुन संस्थेमध्ये सुमारे वर्षभरात ३६,९७,५०० रुपयांचा अपहार केला.
ही अफरातफर कोणाच्या लक्षात येऊ नये, यासाठी चंद्रशेखर म्हेत्रे याने खोटे व बनावट दस्त तयार करुन ते खरे आहे, असे भासवून आतापर्यंत केलेल्या लेखा परिक्षणानुसार ३६,९७,५०० रुपये रकमेचा अपहार केला असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी चंद्रशेखर म्हेत्रे याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. मसपोनि जगताप या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
