सोलापूर : विधीगंध सेवा संस्था व सोलापूर बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे १२, १३ व १४ एप्रिल दरम्यान यावर्षी देखील विधीगंध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. शनिवारी, १२ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ विधिज्ञाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा कार्यक्रम शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती विधीगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅड. संतोष न्हावकर यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.
हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आलाय. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा हस्ते तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील साधारण ४०० ते ५०० विधीज्ञांची उपस्थिती राहणार असल्याचेही अॅड. संतोष न्हावकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वकीलांमध्ये सांघिक भावना वाढावी, या हेतुने विधीगंध क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नेहरू नगर, शासकीय मैदानावर करण्यात आलंय. या स्पर्धेत वकिलांचे एकूण २५ संघ सहभागी होत आहेत. त्यात एकूण ३५ सामने होणार आहेत. 10 षटकांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी, १४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पार पाडणार आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटले.
स्पर्धेतील विजेता संघास कै. व्ही. डी. फताटे यांच्या स्मरणार्थ, उपविजेत्या संघास कै. जयकुमार काकडे स्मरणार्थ उपविजेते पारितोषक देण्यात येणार आहे. कै. अॅड. आर. जी. देशपांडे यांच्या स्मरणार्थ मालिकावीर पुरस्कार, उत्कृष्ठ फलंदाज पुरस्कार कै. जी. एस. आडम यांचे स्मरणार्थ तर उत्कृष्ठ गोलंदाज हे पारितोषक अॅड. रमेश कणबसकर यांचे स्मरणार्थ देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नियोजन हे विधीगंध सेवासंस्थेचे अध्यक्ष अॅड. संतोष न्हावकर करीत आहेत.
या पत्रकार परिषदेस अॅड. जहीर सगरी, अॅड. योगेश कुरे, अॅड. सचिन साखरे आणि अॅड. शैलेश पोटफोडे उपस्थित होते.
... चौकट ...
हे आहेत विधीगंध स्मृति पुरस्काराचे मानकरी !
त्यामध्ये अॅड. वसंतराव भादुले (स्व. भास्कर ऊर्फ तात्यासाहेब नेर्लेकर स्मृति विधीगंध पुरस्कार)
अॅड दत्तात्रय काळे (स्व. अण्णासाहेब ऊर्फ ए. तु. माने स्मृति विधीगंध पुरस्कार)
अॅड. पी. आर. बापुसाहेब करंजकर (स्व. ए. डी. ठोकडे स्मृति विधीगंध पुरस्कार) हे स्मृति विधीगंध पुरस्काराचे मानकरी आहेत.



