विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे 14 एप्रिल 1891 या दिवशी झाला. त्यांचे घराणे मूळचे आंबवडे, ता.मंडणगड (जिल्हा रत्नागिरी) येथील होते. बाबासाहेबांनी आयुष्यभर तळागाळातील माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली. आयुष्यभर इतरांसाठी जगणाऱ्या या महामानवाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते. बहुजन समाज दारूसारख्या व्यसनातून बाहेर पडावा, ही त्यांची तळमळ होती.
बाबासाहेबांचे वडील रामजी हे निर्व्यसनी होते. त्याचप्रमाणे बाबासाहेब ही निर्व्यसनी होते. बाबासाहेब व्यसनापासून दूर राहिले. बाबासाहेबांचे गुरु सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध, संत कबीर, क्रांतीबा ज्योतिराव फुले हे होते. बाबासाहेबांचे आदर्श छत्रपती शिवराय होते. बाबासाहेब चारित्र्यसंपन्न होते.
परदेशात असताना त्यांचा अनेक महिलांशी संपर्क झाला; परंतु त्यांनी चारित्र्यावर कधीही शिंतोडा उडवून घेतला नाही. त्यांचे अफाट लेखन आणि भाषणातून माहिती घेणे हे कठीण काम होते. संस्कृत पंडित सोहन लाल शास्त्री यांनी डॉ. आंबेडकर यांच्याविषयी लिहिले आहे की, एकदा खाजगीत बोलताना बाबासाहेबांनी सांगितले होते की, "नेत्यांचे व्यक्तिगत चारित्र्य आणि सार्वजनिक चारित्र्य ही दोन्ही सारखीच असायला पाहिजेत;अन्यथा तो आपली कर्तव्यं पूर्ण करू शकणार नाही."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर-अनुभव व आठवणी, या पुस्तकात नानकचंद रत्तू यांच्या लेखणीतून व्यसनमुक्ती संदर्भात विचार आहेत.बाबासाहेबांना कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करण्यात रुची नव्हती. याशिवाय ते धूम्रपानही करत नसत. एकदा जेव्हा त्यांना कफाचा त्रास झाला, तेव्हा त्यांना पानाचा विडा खाण्याबद्दलचा सल्ला देण्यात आला.
त्यांना पान आणून देण्यात आले. बाबासाहेबांनी पान खाल्लेही; परंतु लगेच थुंकूनही टाकले. बाबासाहेबांना पानाची कडू चव मुळीच आवडली नव्हती. व्यसनापासून दूर रहावे म्हणून बाबासाहेब किती काळजी घेत होते, हेच या उदाहरणावरून स्पष्ट होते.
फेब्रुवारी 1927 च्या मुंबई विधिमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा करताना बाबासाहेबांनी दारूबंदी योजनेवर टीका केली. दारूबंदी बाबत सरकारने योजना तडीस नेण्याचे धोरण ठरविले होते. यापैकी शिधा पद्धत ही एक होय. मोफत शिक्षण, औषधपाण्याची सुलभता, जीवनोपयुक्त वस्तूंची सुलभता केली तर दारूच्या व्यसनापासून लोक मुक्त होतील, असे त्यांचे मत होते.
बाबासाहेबांवर धनंजय कीर यांच्या पुस्तकात लिहिले आहे-"बाबासाहेबांनी असे जाहीर केले होते की, दारूबंदी मुळे समाजाचे अधःपतन झाले. लोक घरात दारू गाळत असल्यामुळे पुरुषांबरोबर बायकाही दारू पिऊ लागल्या. एका बाजूला सरकारी उत्पन्न बुडाले; दुसऱ्या बाजूला पोलीस खात्यावर भरमसाठ खर्च वाढला. काँग्रेस पक्ष सर्व देशभर दारूबंदी करणार, परमेश्वर काँग्रेस पक्षाचे भले करो करो करो!"
व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे, हे अधःपाताचे आठवे कारण आहे, असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते."भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात व्यसनांच्या संकटाबाबत लेखन केले आहे."मद्यपानाच्या सवयीमुळे सहा प्रकारची संकटे उद्भवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक आणि बुद्धीनाश ही ती सहा संकटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
14 ऑक्टोबर 1956 मध्ये बाबासाहेबांनी धम्मचक्रप्रवर्तन केले. त्यावेळी त्यांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यातील 11 आणि 17 क्रमांकाच्या प्रतिज्ञा व्यसनमुक्तीच्या संबंधित आहेत. 11 क्रमांकांच्या प्रतिज्ञेमध्ये भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे.यातील सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीवका यामध्ये व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे.
17 क्रमांकाची प्रतिज्ञा- मी दारू पिणार नाही.
बाबासाहेबांच्या जीवनात एक प्रसंग हृदयावर कोरला गेला. मुंबईमधील राजगृह बंगल्यातील तो प्रसंग आहे. बाबासाहेब वरच्या मजल्यावर ग्रंथ वाचनात गढून गेले होते. त्यांच्या पत्नी रमाई या स्वयंपाक करीत होत्या. तेवढ्यात एक बाई रडत-ओरडत चालली होती. तिचा दारू प्यायलेला नवरा शिव्या देत तिला मारहाण करत होता. रमाईनी हा दुर्दैवी प्रसंग पाहिला. त्यानंतर त्या धावतच बाबासाहेबांकडे आल्या आणि म्हणाल्या,"साहेब तुम्ही खूप पुस्तके वाचता. त्यामध्ये दारुड्या नवऱ्याच्या जाचातून सुटका होण्याचा उपाय आहे का?" बाबासाहेबांनी रमाईंकडे फक्त पाहिले. त्यावेळी ते काहीही बोलले नाहीत; परंतु त्यांनी बोलणे पक्के ध्यानात ठेवले असावे. परिणामी, बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळी 22 प्रतिज्ञेत मी दारू पिणार नाही, ही एक प्रतिज्ञा आपल्या अनुयायांना दिली.
महिला जागृत झाल्या कि, व्यसनांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे बाबासाहेबांना वाटत होते. महाड येथे 25 डिसेंबर 1927 मध्ये महिला परिषदेत बाबासाहेब म्हणाले, "दारुड्या नवऱ्याला, भावाला घरात घेऊ नका. दारूचा खर्च शिक्षणासाठी करावा." यावरून त्यांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येते.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांची जयंती, त्यांनी लिहिलेली पुस्तके, ग्रंथ वाचून साजरी करावी. त्यांच्या चरित्रातून आपण स्वतः व्यसनमुक्त होण्याचा संकल्प करून आपल्याबरोबरच आणखी 134 लोकांना व्यसनमुक्त करण्याच्या अभियानात सहभागी होऊया!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र शिव अभिवादन !
आणि मानाचा मुजरा !!
सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
जय जिजाऊ!
जय शिवराय!!
जय ज्योतिबा!!!
जय भिमराय!!!!
डॉ.विकास पाटील,
प्रदेश कार्याध्यक्ष - मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषद,महाराष्ट्र.
संचालक - छत्रपती शंभूराजे आधार व्यसनमुक्ती आणि शुगर मुक्ती मार्गदर्शन केंद्र,
सैनिक टाकळी, जि.कोल्हापूर आणि सांगली. 9881172889.
