जेसीबी मालकास मारहाण करून जबरदस्तीने दारू पाजून दिली मारण्याची धमकी; ०६ जणांविरुद्ध गुन्हा

shivrajya patra

सोलापूर : भाडे तत्वावरती चालविण्यासाठी दिलेला जेसीबी चालू आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी गेलेल्या आकाश विष्णु शिंदे (वय-३० वर्षे) याला मारहाण करून  जबरदस्तीने दारू पाजून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. ही घटना सोमवारी, ०७ एप्रिल रोजी अक्कलकोट रस्त्यावरील इस्कॉन मंदिराजवळ दुपारी घडली. याप्रकरणी कल्लप्पा वाघमोडे याच्यासह ०६ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विडी घरकुल गोंधळी वस्ती परिसरातील बालाजी अपार्टमेंट मधील रहिवासी आकाश विष्णु शिंदे याचा जेसीबी कल्लप्पा वाघमोडे आणि सिध्दप्पा वाघमोडे यांना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला होता. तो चालू आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी गेलेल्या आकाश शिंदे यास तुला काय करायचे आहे, जेसीबी चालू असू नाही तर बंद असू दे, असे बोलून कल्लप्पा वाघमोडे याने मागून येऊन डोक्यावर लोखंडी पाईपने व सिध्दप्पा वाघमोडे याने बाजूला पडलेल्या प्लॅस्टिक पाईप उचलून फिर्यादीचे डोक्यात मारुन गळ्यात हात घालून जमिनीवर खाली पाडले.

त्यावेळी वाघमोडे याच्या गाड्यावरती असलेले चौघे ड्रायव्हर तेथे आले. त्यावेळी प्रविण जमादार आणि परशुराम कोळी यांनी आकाशचे हात धरले. त्या स्थितीत अरुण काळे, सिध्दु स्वामी यांनी पाय बांधले.

दरम्यान कल्लप्पा वाघमोडे आणि सिध्दप्पा वाघमोडे यांनी आकाश शिंदे यांच्या सर्वांगास लोखंडी पाईप व पीव्हीसी पाईपने मारहाण केली, तसेच जबरदस्ती करुन दारु पाजली. त्यातच पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली तर तुला जीवे मारुन टाकतो, अशी धमकीही दिली. पोलीस उपनिरीक्षक बनसुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. 

To Top