सोलापूर : गेल्या ४-५ महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय वृध्दापकाळ, श्रावणबाळ योजनेमधील विधवा, घटस्फोटीता, दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणारे अनुदान/ अर्थसहाय्य मिळालेले नाही. या निराधारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांची प्रलंबित असलेली रक्कम तातडीने त्यांना देण्यात यावी, अशी विनंती वल्र्ड ऑफ वुमेन च्या संस्थापक अध्यक्षा विद्या लोलगे यांनी सोमवारी, जिल्हाधिकाऱ्यांकडं एका निवेदनाद्वारे केली.
संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय वृध्दापकाळ, श्रावणबाळ योजनेवर अवलंबित व्यक्तींना योजनेचं अर्थसहाय्य जगण्याचा मोठा आधार असतो. ते यामधून आजारावरील औषधे, वैद्यकीय उपचार घेत असतात, मात्र गेल्या ४-५ महिन्यापासून त्यांना अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांचं दैनंदिन जगणं असह्य झालं आहे. त्यांना ही रक्कम वाढवून कृपया दुप्पट म्हणजे दरमहा ३,००० रुपयांपर्यंत करण्यात यावी, अशी आग्रही मागणी वल्र्ड ऑफ वुमेन (WOW) असोसिएशन च्या विद्या लोलगे यांनी त्या निवेदनात केली.
तसेच या योजनेमधील लाभार्थ्यांना पुढील काळात डी. बी. टी. योजनेद्वारे रक्कम थेट खात्यात दिली जाणर आहे. परंतु ६५ ते ७० वर्षापुढील वृध्दांना आपल्या बँक खात्याला, मोबाईल नंबर संलग्न करणे शक्यच नाही. अशा व्यक्ती मोबाईल कोठून बाळगणार आहेत? वयोमानानुसार मोबाईल हाताळणे शक्य नाही, कृपया ही बाब लक्षात घेऊन त्यातून ज्येष्ठांना त्यातून सूट मिळावी, असाही आग्रह वल्र्ड ऑफ वुमेन (WOW) असोसिएशनच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शासनाकडे धरला आहे.
यावेळी श्रीमती लता उदय ढेरे, श्रीमती यशोदा विशाल सोनवणे, विजयश्री नागनाथ किरनळ्ळी, गीता दत्तात्रय मुळे, रेशमा इब्राहिम शेख, सायरा शब्बीर शेख, सरोजिनी विजय जाधव, छाया विलास गायकवाड, प्रमिला प्रकाश स्वामी, वर्षा व्यंकटेश मुनगा-पाटील, लक्ष्मी बाळू पवार, मार्था श्रीनिवास आसादे, विदर्शना वाघमारे, अनुसया माशाळकर, कविता येरवे, आशा शिंदे आणि शोभा गायकवाड उपस्थित होते.