बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी योगीराज वाघमारे

shivrajya patra

राज्यस्तरावरील संमेलन आदर्शवत करण्याचा केला निर्धार

सोलापूर :  विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने क्रांतीप्रवण झालेल्या सोलापूर नगरीत आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. राज्यस्तरावरील हे संमेलन आदर्शवत करण्याचा यावेळी सर्वांनी निर्धार व्यक्त केला.

सोलापूर शहरात येत्या ३ मे रोजी बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी सोलापुरातील शिक्षक सोसायटीमधील वेळूवन बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी नियोजन बैठक पार पडली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भिक्षुणी, धम्मचारिणी यांची मंगल उपस्थिती होती.

याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी प्रास्ताविकात संमेलनाची रूपरेषा स्पष्ट केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांची या राज्यस्तरीय संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विचार मंचावर संमेलनाचे कोषाध्यक्ष किरण बनसोडे, समन्वयक डॉ. सुरेश कोरे, कार्यवाह भालचंद्र साखरे, प्रा. वशिष्ठ सोनकांबळे, कार्यकारणी सदस्य प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, कामगार नेते चांगदेव सोनवणे, चित्रकार विठ्ठल मोरे,  व्ही. ए. गायकवाड, सुमित्रा जाधव, धम्मरक्षिता कांबळे आणि प्रा.डॉ. एम.डी. शिंदे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी लेखक अंगध मुके, व्ही. डी. गायकवाड,अरुण गायकवाड, निवृत्त मुख्याध्यापिका आशा शिवशरण, प्रा.अहिल्या कांबळे-गायकवाड, संयोगिता ओव्हाळ, आगतराव बनसोडे, युवराज भोसले, मारुती बेलभंडारे , प्रकाश शिंदे, अशोक इंगळे, भारत बनसोडे, विनोद जाधव, दिलीप गायकवाड, राज रोकडे, अमर डोळसे आदींसह मान्यवरांनी विविध सूचना केल्या. यावेळी साहित्यिक, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते तसेच धम्म चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बौद्ध साहित्य विचारांचा अथांग सागर : योगीराज वाघमारे

बौद्ध साहित्य हे प्राचीन, आदर्शवादी विचारांचा अथांग सागर आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. बौद्ध साहित्य जगण्याची ऊर्जा देते. यामुळे सोलापुरातील बौद्ध साहित्य संमेलन सर्वांच्या सहभागातून शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करूया. एकमेकांशी संवाद संपला आहे. तो सुसंवाद घडवत राज्यभरातील लेखक, साहित्यिक यांना विचार व्यक्त करण्यासाठी हे संमेलन राहणार आहे. अध्यक्षपदी निवड झाली हा मोठा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना नूतन अध्यक्ष योगीराज वाघमारे यांनी व्यक्त केली. 

नूतन संमेलन अध्यक्ष योगीराज वाघमारे यांचा अल्प परिचय

नूतन संमेलनाध्यक्ष योगीराज वाघमारे हे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी अस्मितादर्श साहित्य संमेलन मुर्तीजापुर अकोलाचे अध्यक्षपद भूषविले होते. उस्मानाबाद येथे झालेल्या डॉ. आंबेडकर परिवर्तन साहित्य संमेलनाचे ते संयोजक होते. विविध संमेलनात त्यांचे कथाकथन आणि बीज भाषण झाले. उद्रेक, बेगड, गुडदाणी, होरपळ, बहिष्कार हे कथासंग्रह,  सभापती, शिक्षणनामा, धुराळा, पडझड, भीमयुग, आधार, आक्रमण, रात आंधळे, झळ्या, गहीवर या त्यांच्या कादंबरी तर "शाळेचे दिवस" हे आत्मकथन प्रसिद्ध आहे. 

बाल साहित्यात ही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून आंब्याचे झाड, शूरविरांचे माहेर, हमीद आणि इतर कथा, आभाळमाया, पिंपळपान, श्रामणेर, घुसमट,  तुकाराम आणि त्यांचे मित्र असे विपुल साहित्य लेखन त्यांनी केले आहे. विविध वर्गाच्या पाठ्यपुस्तकात बेगड, गुडदाणी, होरपळ , भूमिहीन, मला जायला पाहिजे, सभापती, उद्रेक या कथा पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या होत्या तर मुंबई विद्यापीठात सध्या कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात "रोहित" ही कथा शिकवली जाते. त्याचबरोबर विविध एकांकिकाही त्यांनी लिहिल्या आहेत. महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाड्:मयनिर्मिती पुरस्कारासह अनेक पुरस्कारानं त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलं आहे.

To Top