आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जण विशिष्ट ध्येयापोटी काही ना काही मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. पद, प्रतिष्ठा, संपत्ती, सेवा यासाठी सतत धडपडत असतो. या सर्व गोष्टी प्राप्त करताना त्यात नशिबाचा देखील मोठा वाटा असतो. नशीब आपल्या हातात नसलं तरी आपल्यासाठी योग्य प्रकारचा निर्णय लावून घेणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी सर्वात मोठे हत्यार म्हणजे दुआ मागणे.
असं म्हटलं जातं कि दुआ मोमिन का हथियार है.म्हणजे जिथे सर्व मार्ग संपतात,सर्व प्रयत्न अपुरे पडतात, कोणताही वशिला कामी येत नाही, सगळीकडून निराशा हाती येते, त्यावेळी एक प्रभावी हत्यार आपल्याकडे असते, ते म्हणजे दुआ. ज्यावेळी एखादा त्रस्त माणूस अत्यंत वियोगाने सर्व मार्ग बंद झालेले असताना ईश्वराकडे तन्मयतेने दुआ मागतो.
त्यावेळी ईश्वर आणि भक्त या दोघांमध्ये कोणीही नसतं. ती दुआ थेट अर्शपर्यंत जाते. ती जर कबूल झाली तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही.म्हणून या दुनियेमध्ये याच्या त्याच्याकडे हात पसरवण्यापेक्षा ईश्वराच्या दरबारामध्ये हात उंच करा,तेथे मागा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा.निश्चितपणे आपले इप्सित साध्य होते.
दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाची धावपळ सारखी सुरू असते. तो कधी आराम करीत नाही. सुखाच्या मागे तो धावत असतो. पण हे सर्व करून आपण काय मिळवले, याचा तो कधी विचार करीत नाही. एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी अपेक्षा मनात जन्म घेते. मग तिच्या पूर्तीसाठी तो पुन्हा धावपळ करीत असतो. पण हे सर्व व्यर्थ आहे. जे मिळालं ते आपलं आणि जे मिळेल ते ही आपलं.एवढी माफक अपेक्षा ठेवून जर आपण जीवन बसर केले तर नक्कीच मनाचं समाधान झाल्याशिवाय राहत नाही.
रमजान महिन्याचे आता शेवटचे चार दिवस बाकी आहेत.महिनाभर प्रत्येक मुस्लिम घरामध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.पहाटे सहरी, तीलावत ए कुरआन, नमाज,इफ्तारी अशा पद्धतीने एक धार्मिक वातावरण घराघरातून दिसून येते.हे वातावरण महिनाभरच न राहता वर्षभर कायमस्वरूपी करण्याची आवश्यकता आहे.
रमजान महिन्यामध्ये सर्व प्रकारच्या वाईट कृत्य पासून दूर राहण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो. परंतु पूर्ण वर्षभर सर्वांनीच जर या पद्धतीने वागण्याचे ठरवलं तर निश्चितपणे एक चांगला समाज अस्तित्वात येईल. यासाठी समाजातील सर्वच घटकांनी जे जे चांगले आहे ते स्वीकारावे, त्याचा अंगीकार करावा आणि आपले जीवन समृद्ध आणि संपन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
रमजान महिना हा व्यक्तीच्या जीवन प्रशिक्षणाचा काळ म्हणून गणला जातो. या महिन्यात आत्मसात केले जाणारे सर्व गुण पुढील वर्षभर जर आपल्यात टिकून राहिले तर नक्कीच आपण मानसिक,आत्मिक दृष्ट्या देखील सुदृढ राहू शकतो.
रमजान महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपण एकमेकाला मदत करतो. तीच भावना आज समाजामध्ये सर्वत्र दिसून येत आहे. कोरोना उच्चाटनासाठी सर्व जणांनी मिळून शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. मेडिकल क्षेत्रातील तुरळक गैरप्रकार जर सोडले तर अनेक सेवाभावी संस्था व लोक आपापल्या परीने लोक सेवा करीत आहेत. मानवाच्या निर्मितीचा मूळ उद्देश असा आहे कि सर्वांनी धर्म, जात, पंथ भेद विसरून फक्त मानव आणि मानवता म्हणजे इन्सानियत जोपासण्यासाठी कार्य करण्याची गरज आहे.
आमच्या मित्रांचा एक राब्ता ब्लड ग्रुप आहे. यांच्या माध्यमातून वर्षभर ज्या रुग्णाला रक्ताची गरज भासते, ती गरज भागविण्याचे काम या ग्रुपचे सहकारी करीत असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातिभेद, धर्मभेद केला जात नाही. सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे आणि तो सर्वांना मॅच होतो. त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम करणाऱ्या सर्वच लोकांना आपण सातत्याने सदैव सहकार्य करणे आवश्यक आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण - 9226408082.
