मोहोळ/यासीन आत्तार : मोहोळ पोलीस ठाणेमधील डी. बी. पथकाच्या कामगिरीत संशयित कारचा ' फिल्मी स्टाईल ' पाठलाग करीत सरकारी किंमतीनुसार एका कारसह सुमारे १,३२,२०० हजार रूपयांचा दारू जप्त केलीय. डी.बी. पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बुधवारी, 19 मार्च रोजी ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात यश आलंय.
मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना पोखरापूर कडून आडेगावकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या अल्टो कारमध्ये अवैध मार्गाने विदेशी दारू येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तात्काळ मोहोळ पोलीस ठाणेमधील डी. बी. पथकास या बातमीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
डी. बी. पथक पोखरापूर गावाचे बाहेर रोडला थांबले असता, थोड्या वेळात लाल रंगाची अल्टो गाडी आल्याने त्या गाडीस पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाडीमधील ड्रायव्हरने गाडी न थांबविता ती गाडी प्रचंड वेगाने आढेगावच्या दिशेने भरधाव वेगाने नेली असता, पोलीसांनी त्या गाडीचा पाठलाग केला.
पोखरापूर येथून पाटकुल, सातपुते वस्ती, काळे वस्ती येथुन मगरवाडी व तेथुन तुंगत (ता. पंढरपूर) या गावात गेली पोलीसांनी त्या गाडीचा पाठलाग करून ती गाडी ही तुंगतमधील बिरोबा मंदिराजवळ थांबवली. त्यावेळी ड्रायव्हर हा लगेच गाडीतून उतरून पळून गेला.
त्यावेळी पोलीसांनी त्या मारूती सुझुकी कंपनीची अल्टोचे दरवाजे उघडुन पाहीले असता, त्यामध्ये मागील सिटवर खताचे पोत्यामध्ये अवैध दारू मिळुन आली सदरची गाडी व विदेशी दारू असे मिळुन सुमारे १,३२,२०० हजार रूपयाचा मुद्देमाल हा पोलीसांनी जप्त केला.
त्या गाडीतून फरार झालेल्या चालकाचे नाव सागर पंढरीनाथ लेंगरे (रा.पोखरापूर) व त्याचे साथीदार याचे विरूध्द महाराष्ट्र दारू बंदी कायद्याप्रमाणे दाखल करून त्या गुन्हयाचा तपास पो. हे. कॉ./संदेश पवार हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, पोलीस उप-अधिक्षक संकेत देवळेकर (सोलापुर विभाग), मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर, पो.हे.कॉ. दयानंद हेंबाडे, संदेश पवार, पो.ना. ढवळे, पो.कॉ. अमोल जगताप, सुनिल पवार, संदीप सावंत, स्वप्निल कुबेर, किरण चव्हाण, अविराज राठोड रोहन पवार यांनी पार पाडली.