Type Here to Get Search Results !

दारुड्या पतीचा खून; पत्नीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे चारित्र्यावर संशय घेणाऱ्या दारुड्या पतीचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेली आरोपी कुसुम शहाजी वाघमारे हिला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

या प्रकरणाची हकीकत अशी की, पती-पत्नीच्या वादामुळे काही वर्ष शहाजी व कुसुम विभक्त राहिलेले होते, परंतु पुन्हा शहाजी व कुसुम हे एकत्र राहत होते. या काळात शहाजी कुसुमच्या चारित्र्य संशयावरून तिचा छळ करत होता. त्यामुळे आरोपी कुसुम हिने पती शहाजी हा दारूच्या नशेत आहे, याचा गैरफायदा घेऊन पोटात चाकू मारून त्याचा खून केला व दवाखान्यात पतीचा अपघात झाल्याची खोटी एम. एल. सी. नोंद करून दिशाभूल केली व खोटी माहिती दिली, या आरोपावरून कुसुम वाघमारे हिला पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती.

आरोपी कुसुम वाघमारे हिचा जामीन अर्ज पंढरपूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपी कुसुम वाघमारे हिने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.

मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले की, मयत शहाजी याने दारूच्या नशेत स्वतःच पोटात चाकू खुपसून घेतलेला आहे व तसे त्यांनी डॉक्टरांपुढे सांगितले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपी कुसुम वाघमारेचा जामीन अर्ज मंजूर केला.

याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने तर सरकारतर्फे ॲड. पंकज देवकर यांनी काम पाहिले.