अक्कलकोट : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा गोकुळ परिवाराचे संस्थापक बलभीम शिंदे यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता आणि मॅनेजिंग डायरेक्टर कपिल अशी दोन मुले, नीता एक मुलगी आणि सुना असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता मूळ गावी दहिटणे (तालुका अक्कलकोट) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.तत्पूर्वी त्यांचे पार्थिव दहिटणे येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
दहिटणे गावचे ते बिनविरोध माजी सरपंच होते. १९९७ ते २००२ दरम्यान चपळगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते विक्रमी मतांनी निवडून आले होते. २००३ साली ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. २००२ ते २००७ मध्ये ते पंचायत समिती सदस्य होते. २००३ ते २००७ साली अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. १९९२ मध्ये स्वामी समर्थ कारखान्याचे संचालक होते. फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी चांगले काम केले.
समाजकारण व सहकार क्षेत्रातील एक निष्ठावंत हरपल्याची भावना जेष्ठ नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
बलभीम शिंदे एक आदर्श सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ, राजकारणी होते. राजकारण किंवा समाजकारण करताना त्यांनी तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही, अशा भावना आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल व्यक्त केल्या आहेत.