सोलापूर : "लोकांनी केलेले मतदान नेमके त्याच उमेदवाराला जाते की, आणखी दुसर्या कोणाला जाते, हे प्रश्न जर लोकांच्या मनामध्ये उपस्थित होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे, मशिन्सबाबत सामान्य जनतेत तीव्र नाराजी दिसून येते, मारकडवाडी हे एक उदाहरण असल्याची भावना संभाजी ब्रिगेडचे तालुकाप्रमुख बाळासाहेब बागल यांनी व्यक्त केलीय.
मंगळवारी, ०३ डिसेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर गावात फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाने हस्तक्षेप करून व गुन्हे दाखल करण्याचा दबाव टाकल्यानंतर गावकऱ्यांनी या मतदानापासून माघार जरूर घेतली, मात्र प्रशासनाने केलेल्या दबावामुळे राज्यभर याची चर्चा झाली. आता याच्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात अनेक ठिकाणी मतमोजणी व झालेले मतदान यांमध्ये आढळलेली तफावत आणि त्यांनी काही ठिकाणी आकडेवारीमध्ये झालेला घोळ यामुळे आता अनेक ठिकाणी या इव्हिएम मशीन्सविरोधात आवाज उठवला जात आहे.
याचाच भाग म्हणून बुधवारी पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथिल काही गावकऱ्यांनी व मतदारांनी एकत्र येत डमी इव्हिएम मशीन ला सलाईन लावत एकप्रकारे प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल बोलत होते.
महाराष्ट्रात अशी असंख्य गावे आहेत, जी फेर मतदान व मतमोजणीस उत्सुक आहेत, लोकांच्या मनातील संशय वाढवणाऱ्या घटना इव्हीएमच्या माध्यमातून घडल्या असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यामुळेच जनतेचा निवडणुक आयोग व मतदान प्रक्रियेवर विश्वास उरलेला नाही, म्हणून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले आहे. येत्या काळात आम्ही याबाबत लढत राहु"अशी प्रतिक्रिया बागल यांनी यावेळी बोलताना दिली.
इव्हिएम विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला.यावेळी गावकरी व युवक देखील उपस्थित होते.