सोलापूर / २५ नोव्हेंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या मतमोजणीचा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला. मानवीय लेखन चुकीमुळे करमाळा, माढा, सोलापूर शहर मध्य व सोलापूर दक्षिण या मतदार संघामध्ये मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलीय.
त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 244-करमाळा, 245- माढा, 249—सोलापूर शहर मध्य, 251- सोलापूर दक्षिण या मतदार संघामध्ये मतदान व मतमोजणी मधील आकडेवारीत तफावत दिसून आलीय. त्याचं स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय.
244- करमाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 29 हजार 375 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 29 हजार 377 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 2 मताची वाढ ही केंद्राध्यक्ष केंद्र क्र.115 यांनी नमुना 17 सी मध्ये मतांचा हिशोब लिहीताना चुकीची नोंद घेतल्याने झाली. सदरच्या मानवीय चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.
245-माढा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 67 हजार 691 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 67 हजार 21 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 670 मताची घट आढळून आली. सदरील बाब ही केंद्र क्र.149 केंद्राध्यक्ष यांनी मॉकपोल वेळी नोंदवलेली मते CRC न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाकाऱ्याच्या हस्त पुस्तिकामधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवाराची मतांची तफावत ही त्या केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या मतापेक्षा अधिक असल्यामुळे त्या केंद्राची 670 मते मतमोजणी दिवशी मोजली नाहीत, त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.
249-सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 291 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 289 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 2 मताची घट आढळून आली. सदरील बाब ही केंद्राध्यक्ष केंद्र क्र.197 यांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये 2 प्रदत्त मते ईव्हीएम मतांच्या हिशोबात गृहीत धरल्याने 665 मते नमुद केली तथापि मततोजणीच्या दिवशीच्या ईव्हीएम मध्ये 663 मते आढळून आली. ही मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.
251-सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 23 हजार 624 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 23 हजार 625 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 1 मताची वाढ दिसून आली.
ही बाब केंद्राध्यक्ष यांनी 1 ईलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट चे मत गृहीत न धरल्यामुळे 676 मते असा हिशोब केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये नमुद केला. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मध्ये 677 मते आढळून आल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.