सोलापूर : सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, दक्षिण सोलापूर या कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी राहुल तुकाराम सुतकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर संबंधित कार्यालयाकडून सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ वेळेवर न मिळाल्याने महात्मा गांधी जयंती दिनी आमरण उपोषणास प्रारंभ केला होता, या प्रश्नी सुधीर चंदनशिवे व राजा सोनकांबळे यांच्या मध्यस्थीमुळे संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले.
या उपोषणास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचे विजयकुमार भांगे, राजा सोनकांबळे, सी.एस.स्वामी, सटवाजी होटकर, ज्येष्ठ नेते रघुनाथ बनसोडे, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे शंतनु गायकवाड, चंद्रकांत चलवादी, विठ्ठल मोरे, राजकुमार बनसोडे, अशोक सोनकांबळे, गंगाधर सरवदे, यलदास वामने आदींनी उपोषण स्थळी जाऊन भेट दिली. या उपोषणामध्ये सहभाग नोंदवत सुतकर यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला होता.
या उपोषणासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त सरचिटणीस सुधीर चंदनशिवे यांनी निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक अमर झाल्टे, सोलापुरचे उपनिबंधक किरण गायकवाड, पुणे विभागाचे जाॅंईंट रजिस्टार योगीराज सुर्वे आदी प्रमुख वरिष्ठ अधिकार्यांशी वेळोवेळी मोबाईलद्वारे सुतकर यांच्या मागणीबाबत चर्चा करून यशस्वी मध्यस्थी करून योग्य तोडगा काढून हे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले.
राहुल सुतकर यांच्या मागणीबाबत पुणे व सोलापूर या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार राहुल सुतकर यांच्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चर्चा करून येत्या आठ दिवसात सकारात्मक विचार करून योग्य असा निर्णय घेण्यात येईल, असं लेखी हमीपत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दुपारी दिले. त्यामुळे राहुल सुतकर यांनी अनेक विविध कामगार संघटनेच्या प्रमुख नेत्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी दुपारी सरबत घेऊन उपोषण तात्पुरते स्थगित केलं.
यावेळी विविध कर्मचारी संघटनेचे सुधीर चंदनशिवे, विजयकुमार भांगे, राजा सोनकांबळे, अमृतराव कोकाटे, शंतनु गायकवाड, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब सरवदे या प्रमुख पदाधिकार्यासह सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था दक्षिण सोलापूर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.