पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सोलापूरमधून झाली सुरुवात
सोलापूर : मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सोलापुरातून प्रारंभ झालाय. मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांवर खरमरीत शब्दात टीका केलीय. मराठ्यांनी आता कोणत्याही पक्षाच्या बाजूने उभे न राहता मराठा समाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. त्यासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटीत निवडणूक लढविण्यासंदर्भात निर्णय घ्यायचाय, ' तिथं या ' सादही मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला घातली.
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील यांचं बुधवारी दुपारी तुळजापूरमार्गे सोलापूर शहरात आगमन झालं. त्यांचं रुपाभवानी माता ओव्हर ब्रिज येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सोलापुरातील मराठा आरक्षण शांतता रॅलीचा मार्ग छत्रपती संभाजी राजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा होता. या अर्धा कि. मी. अंतरासाठी जरांगे पाटील यांना ६४ मिनिटे लागली.
तत्पूर्वी मनोज जरांगे-पाटील यांनी ग्रामदैवत सिध्द रामेश्वर यांचं दर्शन घेतल्यानंतर चार हुतात्म्यांनाही अभिवादन केलं. मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी दिलेल्या वेळेपेक्षा उशीरानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती उभारण्यात आलेल्या विचारपीठावर जरांगे-पाटील आगमन झालं. तत्पूर्वी श्रावण सरी अधून-मधून बरसत होत्या, भर पावसातही जनसमुदाय हलला नाही.
मराठा आंदोलनाने नेते मनोज जरांगे हे शरद पवार यांचाच माणूस असल्याची टीका होत असताना, 'पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा', मराठाच निवडून येणार, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जरांगे-पाटील यांनी बुधवारी पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सोलापुरातून प्रारंभ करताना, पवारांवर तोफ डागलीय.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सातारा येथील प्रचारसभेत शरद पवार यांनी पावसात भिजत भाषण केलं होतं, त्यावर जरांगे यांनी हा टोला लगावला. कोण म्हणतंय त्यांचं नकली भांडण आहे, कोण म्हणतंय हा शरद पवारांचा माणूस आहे. कोणी काही म्हणतेय. पण मी फक्त मराठ्यांचाच आहे. मी कोण, या कोड्यात ते पडलेत. त्यांचे हे कोडे उलगडेपर्यंत ते पडलेले असतील. तरीही मी त्यांना कोणाचा हे कोडे उलगडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जरांगे यांनी संपूर्ण भाषणात देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. ते म्हणाले, फडणवीसांनी मराठा समाजाची बाजू न घेता, मराठा समाज बांधवांवर, भगिनींवर अत्याचार करणाऱ्या पोलिसांची बाजू तर घेतलीच पण आता त्यांनी माझ्या विरोधात अभियानच सुरू केले आहे. त्यांनी छगन भुजबळ, नारायण राणे, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील अशा नेत्यांना माझ्या अंगावर सोडले. यातील कोणी भुरटा चोर, कोणी पाकीटमार, सदन घोटाळा करणारा, कोणी ७० हजार कोटीचा घोटाळा करणारा आहे. फडणवीसांनी नेहमी पोलिसांची बाजू घेतली. त्यात एका तरुणाच्या पोटात गोळी घुसली आहे. तो मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहे, आजही त्याच्या पोटातील गोळी डॉक्टर काढू शकले नाहीत, हे गंभीर वास्तवही त्यांनी मराठा समाजासमोर ठेवत, निवडणूक लढवण्याचा निर्णय २९ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीत घेणार असल्याचे शेवटी सांगितले.
.... चौकट .....
भुजबळसोबत असतील तेथील उमेदवार पाडाच !
फडणवीस काही दिवसांपूर्वी सोलापुरात छगन भुजबळांना घेऊन आले होते. त्याचा संदर्भ देत ते महणाले, 'भुजबळांना घेऊन ते कुठे कुठे येतील, तेथील उमेदवार पाडाच, आता तर नावे घेऊनच कार्यक्रम करायचा आहे. भुजबळांनी तीन जाती ओबीसीत घातल्या, आमचे १६ टक्के आरक्षण त्यांनी नेले.' असा आरोप करताना जरांगे यांनी राज्य सरकारवर कोरडे ओढले.