Type Here to Get Search Results !

केवळ स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौक्या सुरू : पोलीस आयुक्त एम राजकुमार


सोलापूर : केवळ स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच पोलीस चौकी हद्दीत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीसांची उपस्थिती दर्शविण्यासाठी संबंधीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी या ४ पोलीस चौक्यात पूर्ण वेळेसाठी त्यांच्याकडील अधिकारी व अंमलदार यांना नियुक्त करावे, अशी सूचना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केली दिली. 

स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर घटकातील मरिआई पोलीस चौकी, सम्राट पोलीस चौकी, नई जिंदगी पोलीस चौकी आणि विडी घरकूल पोलीस चौकी अशा चार पोलीस चौक्यांचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.


मधल्या काळात शासनाने पोलीस ठाणे हद्दीतील कारभार पोलीस ठाण्यातूनच चालावा, नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या आणि तक्रारींचा निपटारा पोलीस ठाण्यातूनच व्हावा, असे अधिसूचित केले होते. या सूचनेमुळे सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस चौक्याचे काम बंद करून ते पोलीस ठाण्यातूनच चालविले जात होते. गेल्या काही वर्षापासून पोलीस चौक्या सुरू करण्यात याव्यात, सामान्यांना हाके सरशी पोलिसांची मदत मिळावी, या उद्देशातून पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांतून पुढे आली होती. 


पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वातंत्र्यदिनी, या चार पोलीस चौकांचे उद्घाटन केले. या पोलीस चौक्या चालू राहतील, मात्र पोलीस चौकीमध्ये कोणत्याही प्रकारची शासकीय कामे (फिर्याद घेणे, तक्रारी अर्ज स्विकारणे, जबाब नोंदविणे) चालणार नाहीत. ही सर्व प्रकारची कामे संबंधीत पोलीस ठाणे येथेच होतील, असेही पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले.


यावेळी पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्रीमती दिपाली काळे, सह. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) राजन माने, सहा. पोलीस आयुक्त (विभाग- १) श्री. अशोक तोरडमल, सहा. पोलीस आयुक्त (विभाग - २) यशवंत गवारी यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.