सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील आंदोलनासाठी बुधवारी, ०७ ऑगस्ट रोजी सोलापूर शहरात येत आहेत. यंदाच्या वर्षात त्यांची तिसऱ्यांदा सोलापूर भेट आहे. ते पश्चिम महाराष्ट्रातील त्यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टण्याची सुरुवात सोलापुरातून करणार आहेत. तुळजापूरहून सकाळी ११ च्या सुमारास ते छत्रपती संभाजी महाराज चौकात येणार आहेत. त्यानंतर त्यांची श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार आहे. या सभेत मराठा आरक्षणासंबंधीची भूमिका समाजापुढं मांडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, ते काय घेतील, हेही महत्वाचे मानले जातंय. या शांतता रॅलीसाठी मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येने येणार आहेत. त्यानुसार तयारी झाल्याची माहिती स्थानिक संयोजकांनी दिलीय.
रॅलीत सहभागी होणाऱ्यांना अल्पोपहारासाठी सुमारे दीड लाख अन्न पॉकिटे वाटली जाणार आहे. त्याच्या सोबत दीड लाख पाण्याच्या बाटल्यांची सोय केली आहे. शांतता रॅली यशस्वी करण्यासाठी तब्बल २००० स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. यातील प्रमुख असलेल्या ११० जणांकडे वॉकिटॉकी असणार आहे.
भाषण सर्वांना ऐकायला मिळावे यासाठी २०० ध्वनिक्षेपक लावले आहेत. तसेच रॅली परिसरात थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी २० स्क्रिनची सोय करण्यात आली आहे. शंभूराजे पुतळा परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतचा रस्ता, तसेच त्याला जोडणारे उपरस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
स्थानिक संयोजकांनी शहर-ग्रामीण भागात बैठका घेतल्या. लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव रॅलीत सहभागी होतील, असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. संघर्ष योध्दा जरांगे-पाटील यांचा सोलापुरात मुक्काम असणार आहे. ते सभेनंतर भेटीगाठी घेणार आहेत. गुरुवारी सकाळी ते सांगलीच्या दिशेने रवाना होतील, असं संयोजकांनी सांगितलंय.
..... चौकट ....
उद्या सांगलीत !
शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्यास पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहरातून सुरुवात होत आहे. दुसरा टप्पा ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्टदरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. या ०७ दिवसांत मनोज जरांगे-पाटील पश्चिम महाराष्ट्रातील ७ शहरांत जाणार आहेत. दुसऱ्या टप्याचा समारोप नाशिक येथे होणार आहे. सोलापुरातील सभेनंतर ते गुरुवारी सकाळी सांगलीला रवाना होतील.