मोहोळ/यासीन अत्तार : अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश करुन कपाटाचे लॉक तोडून कपाटाचे ड्रॉवरमधील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चांदीचे कॉईन असा २ लाख ६४ हजार रूपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना मोहोळ तालुक्यातील चिखली शिवारात गुरुवारी सायंकाळपूर्वी घडलीय. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
चिखली शिवारात धर्मराज महादेव पाटील यांची शेतजमीन असून त्यांनी शेतात घर बांधले आहे. त्यांनी सुरक्षेच्या हेतूने ५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. ते पुण्यात स्थायिक असलेल्या मुलास भेटण्यासाठी गेले होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कूलुप तोडून कपाटातील ऐवज चोरून नेला.
पाटील यांच्या कपाटातून चोरट्याने १,१७,००० रुपयांची रोकड, ५० हजार रूपयांचे १५ ग्रॅम सोन्याचे मणी-मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ०९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, १ ग्रॅम वजनाची लहान मुलांची सोन्याची अंगठी, वेगवेगळ्या देव-देवतांची छायाचित्रे असलेली अकराशे ग्रॅम वजनाची चांदीची ११ नाणी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सुमारे ६, ५०० रुपये किंमतीचे DVR मशीन राऊटर असा एकूण २ लाख ६४ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.