गाव-गाड्यातील मतभेदातून पाठीचं चामडं सोलल्यागत अमानुष चोप;७ जणांविरुध्द गुन्हा दाखल

shivrajya patra


सोलापूर : दुचाकीवर निघालेल्या तरुणास रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुचाकीवर बसवून नेऊन सुरज शत्रुघ्न जाधव आणि इतरांनी गाव-गाड्यातील मतभेदातून अमानुष मारहाण केलीय. ही घटना मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे बुधवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास घडलीय. बाळकृष्ण परमेश्वर गुरव (वय- २८ वर्ष) असं जखमी तरूणाचं नांव आहे. त्याच्या पाठीची चामडी सोलल्यागत जखमा झाल्या असून त्यास उपचारासाठी येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याच्या फिर्यादीनुसार कामती पोलिसांनी सुरज शत्रुघ्न जाधव याच्यासह ०७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कुरुल येथील बाळकृष्ण गुरव त्याचा मित्र रोहित पाटील याची मोटरसायकल घेऊन काम तिकडे निघाला होता. कुरूल येथील साईसुमन मंगल कार्यालजवळ पाठीमागून आलेल्या सुरज शत्रुघ्न जाधव व महादेव निकम याचा मुलाने पाठलाग करून परमेश्वर पिंपरी शिवारातील परमेश्वर मंदीराजवळ त्याचा शर्ट पकडून दुचाकी थांबवली. 

तेथे सुरज जाधव व त्याच्या साथीदारानं लाथा बुक्क्यांनी व लिंबाच्या झाडाच्या फाट्याने मारहाण करीत शिवीगाळी केली. मला मारहाण करू नका अशी विनंती करीत असतानाही ते ऐकत नसल्याने बाळकृष्ण गुरव यांनी त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावर चिडलेल्या दोघांनी पकडून पुन्हा मारहाण केली व दुचाकीवर बसवून, याला भरपूर चोप देऊ असे म्हणत शत्रुघ्न जाधव यांच्या घरापुढे नेले.



त्यास त्या ठिकाणी दोघांनी झाडाच्या ओला फोका काढून पाठीत व सर्वांगावर मारू लागल्यावर जवळच उभे असलेले शत्रुघ्न जाधव यांचा पुतण्या प्लॅस्टिक पाईपने व प्रमोद लांडे याचा मुलाने लाकडी फळीने डोक्यात व पाठीवर मारहाण केली. त्यावेळी शत्रुघ्न जाधव व त्यांचे भाऊ बाळासाहेब जाधव व आण्णा जाधव तेथे आले. त्यांच्यासमोर विनंती करीत शत्रुघ्न जाधव यांनी जखमी बाळकृष्णच्या छाताडावर लाथ मारून, 'गावातील कोण तुला साथ देत आहे', असा जाब जखमीस विचारला. 

त्यातही वेदनांनी तळमळत असलेल्या बाळकृष्ण गुरव याने विचारणा केल्यावर, बाळासाहेब जाधव व अण्णा जाधव यांनी 'आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत काय' म्हणून बाळकृष्ण ला दोरखंडाने पुन्हा मारहाण केली. जखमीस कामती पोलिसांनी प्रारंभी कामती आरोग्य केंद्रात नेले त्यानंतर अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी कामती पोलिसांकडे सुरज शत्रुघ्न जाधव याच्यासह ०७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

.... चौकट .....

... तुला कोण साथ देतंय ते सांग, म्हणत घातल्या लाथा !

मारहाणीच्या वेदनांनी तडफडत असलेल्या बाळकृष्णने  शत्रुघ्न जाधव याला 'तात्या, मी तुमच्या पाया पडतो मारू नका' असे म्हणत असताना शत्रुघ्न जाधव यांने त्याच्या छातीवर लाथ मारली, ' तू मला का शिव्या देतो, गावातील तुला कोण साथ देतंय ते सांग, असे म्हणत होता. 

त्यावेळी बाळकृष्णने त्यांना 'तुम्ही माझ्याविरूध्द कामती पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात का इन्व्हॉल्व्ह झाला', असे म्हणत असताना बाळासाहेब जाधव व अण्णा जाधव यांनी 'आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत काय', असे म्हणून दाव्याने मारहाण केली तर शत्रुघ्न जाधव यांनं पुन्हा पोटात, छातीवर लाथा मारल्याचं जखमीनं सांगितलं.

To Top