मोहोळ : अज्ञात चोरट्यांनी कृषि खतांच्या दुकानाच्या पाठीमागील बाजूचे लोखंडी पत्रे कापून दुकानात प्रवेश करुन सुमारे रोख रक्कमेसह ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेलाय. ही घटना मोहोळ तालुक्यातील खवणी येथे मंगळवारी सकाळपूर्वी घडलीय. चोरट्यांनी नॅनो डी.ए.पी. खताच्या बाटल्याही चोरून नेल्याचे सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खवणी येथील श्री विठ्ठल कृषी केंद्र नावाचे कृषी खते व औषधे विक्रीचे दुकान सोमवारी दिवसभराचा व्यवसाय करून रात्री बंद करण्यात आले. अज्ञात चोरट्याने रात्री दुकानाचे लोखंडी पत्रे कापून दुकानातील सुमारे ४३ हजार रुपयांची रोकड, टीसीएल कंपनीचा टीव्ही, २० हजार रुपये किमतीचे इन्व्हर्टर बॅटऱ्या, सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या नॅनो डी.ए.पी. खताच्या बाटल्या ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी समर्थ रामेश्वर भोसले यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलीस हवालदार भोसले या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.