Type Here to Get Search Results !

तहसिलदार यांच्या आदेशाला केराची टोपली; कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार


मोहोळ/यासीन अत्तार : जन्म-मृत्यू नोंदीच्या कामात तहसिलदार यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या मोहोळ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराला तात्काळ पायबंद घालण्याची मागणी स्वतंत्र सेनानी उत्तरधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मोहोळ बुराण रेणापुरे यांनी बुधवारी, एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केलीय.

सामान्य नागरिकांना छोट्या-छोट्या कामासाठी मोहोळ तहसील कार्यालयात जावं लागते. तेथे आलेल्या जनतेशी कार्यालयातील शासकिय कर्मचारी व खाजगी कर्मचारी व ठेकेदार तालुक्यातील गरजू जनतेला जन्म-मृत्युच्या नोंद करण्याकरीता भयंकर स्वरुपाचा आर्थिक व मानसिक त्रास देत आहेत. तेथे वरिष्ठांचा आदेशही निष्प्रभ होतो, असा कटू अनुभव पदो-पदी येतोय.

तहसील कार्यालयातील कर्मचारी आर्थिक पिळवणूक करत आहेत. जन्म-मृत्यूच्या नोंदीबाबत कर्मचाऱ्यांना जनतेने विचारले असता, 'आपण कोणाकडे तक्रार करायचे तेथे करा, आमचे कोणीही वाकx करु शकत नाहीत' अशी उत्तरं सहजा-सहजी कानी पडतात, पैशाची मागणी करतात. अशा मस्तवाल अधिकारी -कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करुन या कार्यालयातील बेबंदशाही त्वरीत थांबवावी, असं बुराण रेणापुरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय.