कासेगांव / संजय पवार
उत्तर सोलापूर तालुक्यातील हिप्परगे (तळे) येथील हर्षवर्धन हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या सालात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव विठ्ठलराव गरड व संस्था सदस्य सहदेव ढवळे, विपुल गंभीरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी इयत्ता ५ वीतील विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच प्रशालेतील विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वाटप ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांनी दिली. यावेळी उळे गावातील पालक कुंडलिक खंडागळे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून २१ गणवेश दिले. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गुंड, सूत्रसंचालन सुरेश शिंदे तर श्रीमती मीरा माने यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी परिसरातील पालक उपस्थित होते.