Type Here to Get Search Results !

०३ लाख रुपयांच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेले ' बुरखे 'ही जप्त; गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी



सोलापूर : सोन्या-चांदीचे दुकानात हातचलाखी करून, चोरी करणाऱ्या बुरखाधारी महिलांनी उच्छाद मांडला होता. अशा स्वरूपाच्या सातत्याने घडत असलेल्या चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पथकास सूचना केल्या होत्या. या 'हात चलाखी' च्या चोऱ्या आणि बुरखाधारी महिला यांच्याविषयी गोपनिय माहिती संकलित करून गुन्हे शाखेच्या पथकाने ०३ महिलांना गजाआड केले. त्यांच्या ताब्यातून जवळपास ०३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात वापरलेले बुरखेही जप्त करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सराफी दुकानात दागिने खरेदीच्या निमित्ताने जाणाऱ्या बुरखाधारी महिला हात चलाखीने सोन्या चांदीचे दागिने चोरी करीत असल्याचे गुन्हे दाखल झाले होते. बहुतांशी या गुन्ह्यामध्ये संशयित महिला बुरखा परिधान करून सराफी दुकानात गेलेल्या असायच्या. दुकानदाराचे लक्ष विचलित करून दागिने चोरण्याची त्यांची पद्धत जवळपास सर्व ठिकाणी साम्यतेची होती. या बुरखाधारी महिलांचा शोध घेऊन ते गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना व मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले होते.

त्या अनुषंगाने, गुन्हे शाखेकडील पो.उप.नि. अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी, चोरी झालेल्या ज्वेलरी दुकानाचे आसपासचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनिय बातमीदारांच्या मार्फतीने माहिती काढून, २८ मे रोजी, या गुन्ह्यातील संशयित ३ महिलांना ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक केली. त्यांच्यासह ०४ महिलांनी बुरखा परिधान करून २४ मे रोजी, अशोक चौक येथील राजेश ज्वेलर्स चे दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन, दुकानदाराची नजर चुकवुन सोन्यांचे दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. 

त्यानंतर, पो.उप नि. अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी या महिलांकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, नमूद महिलांनी सोलापूर शहरातील आणखी ०७ सोन्या-चांदीचे दुकानांतून, अशाच प्रकारचे चोरी केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे, त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले २८.७५० ग्रॅम सोन्याचे दागिने व १५५ तोळे चांदीचे दागिने असे एकूण २,९५,२०० रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

या महिला आरोपींकडून, सोलापूर शहरातील खालीलप्रमाणे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.


अ.क्र.        पोलीस स्टेशन                   कलम

०१ जेलरोड पोलीस ठाणे,  भादंवि कलम ३८०, ३४

०२ फौजदार चावडी पोलीस ठाणे, भादंवि कलम ३७९

०३ विजापूर नाका पोलीस ठाणे, भादंवि कलम ३८०, ३४

०४ सदर बझार पोलीस ठाणे, भादंवि कलम ३८०, ३४

०५ सदर बझार, पोलीस ठाणे, भादंवि कलम ३७९, ३४

०६ जेलरोड पोलीस ठाणे,        भादंवि कलम ३८०, ३४

०७ एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे, भादंवि कलम ३८०, ३४

०८ एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे, भादंवि कलम ३८०, ३४

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, सैपन सय्यद, भारत पाटील, सुभाष मुंढे, सिध्दाराम देशमुख, वसिम शेख, सतिश काटे, महिला पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, शिलावती काळे, सुमित्रा बारबोले, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे आणि सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली.

.... या आहेत बुरखाधारी महिला

संगीता शेखर जाधव (वय ४५ वर्षे, रा. घर नं. ५८, चर्च जवळ, धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर), गौराबाई बब्रुवान जाधव (वय ७५ वर्षे, रा. घर नं. २४२, धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर), मंजुश्री उर्फ बेबी सुनिल जाधव (वय ४० वर्षे, रा. घर नं. २४२, धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर) यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्यामध्ये, आणखी एक महिला राणी अजय गायकवाड (रा. धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर) हिचा या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचे सांगितले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले बुरखे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.